इराणकडे कित्येक अणुबॉम्ब बनविण्याइतके युरेनियम आहे

अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांचा इशारा

Iran has enough uraniumब्रुसेल्स – इराणने ठरविलेच तर एक नाही तर कित्येक अणुबॉम्ब्ज्‌‍ची निर्मिती करण्यासाठी आवश्यक युरेनियमचा साठा त्यांच्याकडे आहे, हे नाकारता येणार नाही, असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी दिला. पण इराणने अजून तरी अणुबॉम्बची निर्मिती केली नसून पाश्चिमात्य देशांनी इराणला रोखण्यासाठी आपले प्रयत्न दुपटीने वाढवावे, असे आवाहन ग्रॉसी यांनी केले. तर दुसऱ्या बाजूला अणुबॉम्ब निर्मितीजवळ पोहोचलेल्या इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ले चढविण्याची तयारी झालेली आहे, असे इस्रायलच्या यंत्रणा बजावत आहेत.

इराणकडे किमान एक अणुबॉम्ब तयार करता येईल, इतका युरेनियमचा साठा असल्याचा दावा ग्रॉसी यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. पण अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक संवर्धित युरेनियम नसल्याचे ग्रॉसी यांनी म्हटले होते. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी ९० टक्के शुद्धतेचे संवर्धित युरेनियम आवश्यक असल्याचे अणुऊर्जा आयोगाचे म्हणणे आहे. तर इराणकडे ६० टक्के शुद्धतेचे सुमारे ७० किलो वजन इतके संवर्धित युरेनियम असल्याची माहिती ग्रॉसी यांनी दिली होती. अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर हल्ल्याची तयारी करण्याचे जाहीर केले होते.

iran nuclear plantपण ग्रॉसी यांनी बुधवारी युरोपियन संसदेच्या उपसमितीसमोर दिलेल्या माहितीत, इराणने एक नाही तर कित्येक अणुबॉम्ब्ज्‌‍च्या निर्मितीसाठी आवश्यक युरेनियमचा साठा मिळविल्याचे जाहीर करुन खळबळ उडविली. त्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे ग्रॉसी सुचवित आहेत. पण इराणने अणुबॉम्बची निर्मिती केलेली नाही, याची आठवणही अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख करून देत आहेत. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशांनी इराणबरोबरील वाटाघाटींचा वेग व प्रयत्न दुपटीने वाढवावे, असे आवाहन ग्रॉसी यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी माध्यमांशी बोलताना, पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू इराणवर हल्ल्याचा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा दिला होता. तर इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी देखील आपले लष्कर इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्यासाठी तयार असल्याचे बजावले होते.

leave a reply