इराणकडे अणुबॉम्ब निर्मितीचे तंत्रज्ञान आहे

- इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या प्रमुखांची घोषणा

अणुबॉम्बतेहरान – ‘इराणकडे अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आहे. पण अणुबॉम्ब निर्मितीची इराणची योजना नाही’, अशी घोषणा इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या प्रमुखांनी केली. तीन आठवड्यांपूर्वी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचे वरिष्ठ सल्लागार कमाल खराझी यांनी देखील आपल्या देशाकडे अणुबॉम्ब निर्मितीची क्षमता असल्याचा दावा केला होता. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक युरेनिअमचे संवर्धन शक्य असल्याचे खराझी म्हणाले होते. दरम्यान, अमेरिकेबरोबर अणुकरारावरील वाटाघाटी फिस्कटल्यानंतर महिन्याभरात दुसऱ्यांदा इराण जाहीरपणे हा इशारा देत आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमातील हालचालींकडे लक्ष वेधले होते. इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक वळणावर असल्याची टीका इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केली होती. तसेच अणुबॉम्बची निर्मितीच्या प्रयत्नात असलेल्या इराणच्या अणुप्रकल्प व संबंधित ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा सज्जड इशारा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला होता. इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना इस्रायलच्या या आरोपांना उत्तर दिले.

अणुबॉम्बइराण अण्वस्त्रसज्ज होत असल्याचा इस्रायलचा आरोप खोटारडा असल्याचे इस्लामी यांनी सांगितले. तसेच अणुबॉम्बच्या निर्मितीची इराणची कुठलीही योजना नसल्याचे इस्लामी म्हणाले. पण इराणकडे अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञानविषयक सज्जता असल्याची घोषणा इस्लामी यांनी केली. इराण अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो, अशी घोषणा गेल्याच महिन्यात इराणने केली होती. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचे वरिष्ठ सल्लागार कमाल खराझी यांनी इस्लामी यांच्याप्रमाणेच अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक तंत्रज्ञान व साहित्य असल्याचे जाहीर केले होते.

गेल्या वर्षभरापासून अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरारासंबंधी वाटाघाटी करीत आहेत. व्हिएन्ना व त्यानंतर दोहा येथे झालेल्या या वाटाघाटी अपयशी ठरल्याचा दावा केला जातो. अमेरिकेला अणुकरार करण्यात स्वारस्य नसल्याचा आरोप इराणने केला होता. त्यानंतर इराणने गेल्या तीन आठवड्यात दोन वेळा अणुबॉम्ब निर्मितीचे तंत्रज्ञान व साहित्य आपल्याकडे असल्याचा इशारा दिला आहे.

leave a reply