इराणला इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे

- इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचा नवा इशारा

तेहरान/मॉस्को – इराणच्या अणुकार्यक्रमावरुन धमकावणार्‍या इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार इराणकडे आहे, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले. त्याचबरोबर इराणवर आरोप करणारा इस्रायलच आपल्या अणुकार्यक्रमात लपवाछपवी करीत असल्याचा ठपका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला. दरम्यान, आपल्या अणुकार्यक्रमाची सुरक्षा करणे हे इराणचे धोरणात्मक ध्येय असून त्याविरोधात भूमिका घेऊन अरब देश इस्रायलचे हितसंबंध जपत असल्याचा टीका इराणने केली.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी रशियाचा दौरा करून परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत दिलेल्या इशार्‍यावर लॅपिड आणि लॅव्हरोव्ह यांच्यात चर्चा झाल्याचे दोन्ही देशांनी जाहीर केले. इराण वेगाने संवर्धित युरेनियम आणि सेंट्रिफ्युजसेच्या संख्येत वाढ करीत आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाचा हा वेग धोकादायक असल्याचे अणुऊर्जा आयोगाने बजावले होते. त्याचबरोबर इराण आयोगाच्या निरिक्षकांनी अणुप्रकल्पातील निरिक्षणासाठी परवानगी देत नसल्याचे म्हटले होते.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या या अहवालावर अमेरिका आणि जर्मनीने चिंता व्यक्त केली. तर इराणने आयोगाशी पूर्ण सहकार्य करावे, अशी भूमिका रशियाने स्वीकारली आहे. अशा परिस्थितीत, इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाचा दौरा करून इराणच्या अणुकार्यक्रमापासून इस्रायलच नाही तर जगाला धोका असल्याचा इशारा दिला. तसेच अणुबॉम्बच्या निमित्तीसाठी प्रयत्न करणार्‍या इराणला रोखण्याचा अधिकार इस्रायलला आहे, असे परराष्ट्रमंत्री लॅपिड म्हणाले. त्याचबरोबर इराण किंवा इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी सिरियातून इस्रायलवर हल्ले चढविले, तर त्यालाही चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

सौदी अरेबिया, युएई, इजिप्त आणि बाहरिन या देशांनी देखील गुरुवारच्या बैठकीत अणुऊर्जा आयोगाच्या या अहवालावर चिंता व्यक्त केली. तसेच आपल्या अणुकार्यक्रमाद्वारे इराण या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवून अरब देशांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप या अरब देशांनी केला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझदेह यांनी या आरोपांना उत्तर दिले.

‘इराणला उपदेश देणार्‍या इस्रायलने अवैधरित्या अणुबॉम्बची निर्मिती केली व अण्वस्त्रप्रसारबंदी विधेयकावर स्वाक्षरी करण्याचे टाळले होते. पण इराणने अण्वस्त्रप्रसारबंदी विधेयकावर स्वाक्षरी करून सर्वाधिक वेळा आपला अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय निरिक्षकांसाठी खुला केला. पण इस्रायल हा पाश्‍चिमात्य देशांचा लाडका आणि पिळवणूक करणारा देश आहे. इस्रायलचे हे अस्थैर्याचे राजकारणाला आता जगाच्या लक्षात येऊ लागले आहे’, अशी टीका खातिबझदेह यांनी केली.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि इराण यांच्यात छुपे युद्ध सुरू असल्याचा दावा केला जातो. पर्शियन आखातापासून हिंदी महासागर ते रेड सी आणि भूमध्य समुद्रापर्यंतच्या क्षेत्रात इस्रायल व इराण परस्परांच्या जहाजांवर हल्ले चढवित असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे सदर सागरी क्षेत्राची सुरक्षा धोक्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply