इराण-रशियातील व्यापारात 15 टक्क्यांची वाढ

धोरणात्मक सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न

iran russia tradeतेहरान – 2022 साली रशिया आणि इराणमधील व्यापारात तब्बल 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे उभय देशांमधील व्यापार 4.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याची माहिती रशियन संसदेचे सभापती वाशेस्लाव्ह वोलोदिन यांनी दिली. पाश्चिमात्य मित्रदेश रशिया व इराणवर निर्बंध लादत असताना दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्य नव्या उंचीवर नेण्याची आवश्यकता असल्याचे रशिया व इराणच्या नेत्यांनी म्हटले आहे.

रशियन संसदेचे सभापती वाशेस्लाव्ह वोलोदिन हे इराणच्या दौऱ्यावर असून त्यांनी इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकेर कालिबाफ यांची भेट घेतली. गेल्या वर्षी इराण आणि रशियामध्ये पार पडलेल्या 25 वर्षांच्या मुक्त व्यापारी कराराचा वोलोदिन यांनी उल्लेख केला. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापारात वाढ होईल, असा विश्वास वोलोदिन व कालिबाफ यांनी व्यक्त केला. यासाठी आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रातील परस्पर सहकार्याचा उल्लेख करून दोन्ही देशांनी राष्ट्रीय चलनात व्यवहार करावे, असे वोलोदिन म्हणाले.

रशियाची ‘मिर’ तर इराणची ‘शेताब’ ही ऑनलाईन देयक यंत्रणा वापरण्याचा प्रस्ताव रशियन संसद सभापतींनी ठेवला. यामुळे पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा तितकासा परिणाम होणार नसल्याचा दावा वोलोदिन यांनी केला. इराणबरोबरचा व्यापार रशियासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण रशियाला आखात तसेच दक्षिण आणि आग्नेय आशियाई जोडण्यासाठी इराण ‘लॉजिस्टिकल ब्रिज’ ठरेल, असे वोलोदिन पुढे म्हणाले. या व्यतिरिक्त रशिया व इराणमध्ये विशेष लष्करी सहकार्य प्रस्थापित होणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

leave a reply