इराण-रशियावरील पाश्‍चिमात्यांचे निर्बंध नियमांचा भंग करणारे

- रशियन परराष्ट्रमंत्र्यांची टीका

पाश्‍चिमात्यांचे निर्बंधमॉस्को – ‘पाश्‍चिमात्य देशांनी रशिया आणि इराणवर लादलेले निर्बंध आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन ठरतात. कारण हे निर्बंध थेट रशिया व इराणच्या जनतेला लक्ष्य करतात. या निर्बंधांबाबत रशिया व इराणची भूमिका एकसमान आहे’, अशी टीका रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केली. अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर नवे निर्बंध लादल्यानंतर रशियाची ही प्रतिक्रिया आली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिरअब्दोल्लाहियान यांनी रशियाचा दौरा करून परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांची भेट घेतली. अमेरिका व युरोपिय देश इराणबरोबरच्या अणुकरारासंबंधी शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. कुठल्याही क्षणी हा करार संपन्न होईल, असा दावा केला जातो. पण या अणुकरारातील सहभागी देश असणार्‍या रशियावर अमेरिका व युरोपिय देशांनी गेल्या २० दिवसांमध्ये कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

युक्रेनवरील हल्ल्याप्रकरणी अमेरिका व मित्रदेशांनी लादलेले हे निर्बंध अणुकरारासाठी मारक ठरतील, असा इशारा रशियाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर इराणने देखील या अणुकराराबाबत अधिकच ताठर भूमिका स्वीकारली होती. तर रशियाने आपल्यावरील निर्बंधांचा मुद्दा इराणबरोबरच्या अणुकराराशी जोडू नये, असे अमेरिकेने बजावले होते.

अशा परिस्थितीत, मंगळवारी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाचा दौरा केला आहे. संबंधित अणुकरारानंतर इराणच्या अणुकार्यक्रमाला सहाय्य करण्यासाठी रशियावर कुठलेही निर्बंध नसावे, याची हमी अमेरिका व मित्रदेशांनी द्यावी, अशी मागणी रशियाने केली होती.

leave a reply