युक्रेनमधील युद्धाशी संबंध नसलेला चीन अमेरिकेचे निर्बंध ओढावून घेणार नाही

- चीनच्या परराष्ट्रमंत्री वँग ई

युद्धाशी संबंध नसलेला चीनबीजिंग/रोम/वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धात चीन सहभागी झालेला नाही, त्यामुळे या युद्धावरून चीनला लक्ष्य करून निर्बंध लादले जाऊ नयेत, असे आवाहन चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केले. अमेरिका व युरोपिय देशांकडून चीनने रशियाला सहाय्य पुरवू नये म्हणून दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी सोमवारी चीनचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांनी रोममध्ये भेट घेतली. या भेटीत अमेरिकेने, रशियाबरोबरच्या सहकार्यावरून चीनला तंबी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिका, युरोप व मित्रदेशांनी रशियावर जबरदस्त व कठोर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांना तोंड देण्यासाठी रशियाकडून विविध पर्यायांचा वापर करण्यात येत असून चीनचे सहकार्य हा सर्वात महत्त्वाचा पर्याय असल्याचे मानले जाते. गेल्याच महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चीनचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. या भेटीत दोन देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्यावर एकमत झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याचवेळी रशिया व चीनदरम्यान इंधन करारांसह इतर क्षेत्रातील करारही पार पडले होते.

युद्धाशी संबंध नसलेला चीनही पार्श्‍वभूमी लक्षात घेता, पाश्‍चिमात्य देशांनी टाकलेल्या निर्बंधांना तोंड देण्यासाठी चीन आपल्याला सहाय्य करेल, असा रशियाला विश्‍वास आहे. रशियन बँका व इतर कंपन्यांनी चीनच्या युआन चलनातील व्यवहारांनाही सुरुवात केली आहे. रशियाच्या परकीय गंगाजळीतील मोठा हिस्सा चीनमध्ये गुंतविलेला आहे. पाश्‍चात्यांनी टाकलेल्या निर्बंधांमध्ये ५० टक्के परकीय गंगाजळी अडकल्याने रशियासाठी चीनमधील हिस्सा महत्त्वाचा ठरतो. चीनकडून मिळणार्‍या सहाय्याच्या बळावर रशिया निर्बंधांना तोंड देईल, याची कल्पना असल्याने अमेरिका व युरोप चीनवर दबाव वाढविण्याच्या हालचाली करीत आहेत.

अमेरिकेने गेल्या काही दिवसांमध्ये याबाबत चीनला सातत्याने इशारे दिले होते. मात्र चीनने त्याला दाद दिली नसल्याचे दावे करण्यात येतात. मात्र रोममध्ये झालेली चर्चा व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्याला छेद देणारे ठरते. रोममधील चर्चेत अमेरिकेने चीन-रशिया सहकार्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच चीनला त्याचे परिणाम सहन करावे लागतील, असे बजावले. त्याला प्रत्युत्तर देताना चीनने अमेरिकेला ‘तैवान’च्या मुद्यावरून आपल्याला लक्ष्य करणे थांबवा, असा इशारा दिला.

युद्धाशी संबंध नसलेला चीनचीनच्या अर्थव्यवस्थेला गेल्या वर्षभरात सातत्याने धक्के बसत असून आर्थिक विकासदरात घसरण होण्याचे संकेत मिळत आहेत. ही घसरण राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी मोठे आव्हान ठरु शकते. जिनपिंग यांचे नेतृत्त्व व चिनी जनतेतील प्रतिमा यांना अर्थव्यवस्थेतील घसरणीमुळे धक्का बसू शकतो. रशियाला करण्यात येणार्‍या सहकार्यामुळे नव्या निर्बंधांचा सामना करावा लागला तर चीनच्या अर्थव्यवस्थेला नवे फटके बसू शकतात. ते टाळण्याची कसरत चीनला करावी लागणार आहे. हे लक्षात ठेऊनच चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशिया-युक्रेन युद्धात आपल्या देशाचा सहभाग नसून आपल्यावर निर्बंधही टाकले जाऊ नयेत, अशी मागणी केली आहे.

leave a reply