इराणच्या युद्धनौकांचा अटलांटिक महासागरातील वावर चिंताजनक – अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन

वॉशिंग्टन/तेेहरान – इराणच्या युद्धनौकांचा अटलांटिक महासागरातील प्रवेश व लॅटिन अमेरिकेत होणारी इराणी शस्त्रास्त्रांची विक्री अत्यंत चिंताजनक गोष्ट असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी बजावले. गुरुवारी इराणच्या दोन युद्धनौकांनी पहिल्यांदाच अटलांटिक महासागरात प्रवेश केल्याची माहिती इराणी नौदलाने दिली होती. या युद्धनौका व्हेनेझुएलाला भेट देणार असून त्यात शस्त्रास्त्रे असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्रीइराणी नौदलातील ‘साहंद’ ही विनशिका व ‘फॉरवर्ड बेस’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘मकरान’ या युद्धनौका अटलांटिक महासागरात दाखल झाल्याची माहिती इराणी नौदलाने दिली आहे. या युद्धनौका व्हेनेझुएलाला भेट देणार आहेत. ‘पॉलिटिको’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या युद्धनौकांवर ‘फास्ट अटॅक बोट्स’ असण्याची शक्यता आहे. याच वृत्तात इराणी युद्धनौकांवर दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे असल्याचाही दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील काही अधिकार्‍यांनीही त्यावर शस्त्रास्त्रे असू शकतात, असे संकेत दिले आहेत.

अमेरिकेचे संरक्षणमंत्रीया पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या संसदेत झालेल्या सुनावणीत संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांना इराणी युद्धनौका व संभाव्य शस्त्रे याबद्दल प्रश्‍न विचारण्यात आले. ‘अमेरिकेच्या नजिकच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा प्रसार होणे ही माझ्यासाठी अत्यंत गंभीर बाब ठरते. इराणला लॅटिन अमेरिकी देशांमध्ये शस्त्रपुरवठा करण्याची संधी देणे हे अतिशय चिंताजनक उदाहरण ठरु शकते’, असे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेही याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘इराणच्या युद्धनौका आंतरराष्ट्रीय नियम तोडून शस्त्रे नेत असतील तर त्यांना रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील’, असा इशारा परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिला आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाच्या काळात इराणने व्हेनेझुएलाला इंधनपुरवठा करण्यासाठी जहाजे पाठविली होती. अमेरिकेने इराणची चारही जहाजे ताब्यात घेतली होती.

इराणी युद्धनौकांच्या मुद्यावर संरक्षणमंत्री चिंता व्यक्त करीत असले तरी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष व्यवस्था करण्यात आली नसल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. बायडेन प्रशासनाने क्युबा व व्हेनेझुएलाच्या सरकारशी संपर्क साधून युद्धनौका माघारी धाडण्याबाबत बोलणी केल्याचे दावेही समोर येत आहेत.

leave a reply