अम्मान – सिरियातील भूकंपाचा फायदा घेऊन येथील पीडितांसाठी मानवतावादी सहाय्य रवाना करण्याच्या बहाण्याने इराणने सिरियात शस्त्रतस्करी केली. या काळात इराणने इस्रायलला लक्ष्य करण्यासाठी शस्त्रास्त्रे, रडार तसेच संपर्क यंत्रणा सिरियात उतरविल्याचा खळबळजनक दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला. इराण सिरियावरील आपत्तीचा वापर करून शस्त्रास्त्रांची तस्करी करीत असल्याचा आरोप करुन इस्रायलने यावर हल्ले चढविण्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला होता.
फेब्रुवारी महिन्यात सिरियाला बसलेल्या भूकंपाच्या तडाख्यात सहा हजारांहून अधिक जणांचा बळी गेला होता. सिरियातील भूकंपपीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरातून मदतीचा ओघ सुरू होता. सिरियाचा मित्रदेश असणाऱ्या इराणने देखील प्रवासी विमानांचा वापर करुन सिरियाला मानवतावादी सहाय्य पुरविले होते. पण या सहाय्याच्या आडून इराणने सिरियात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे उतरविल्याचा गंभीर आरोप इस्रायलने केला होता. इराणने इस्रायलचे आरोप फेटाळले होते. पण सिरिया, इराण, इस्रायल तसेच पाश्चिमात्य सूत्रांनी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत या आरोपांचा पुनरुच्चार केला.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात नष्ट झालेला शस्त्रसाठा भरून काढण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेली संधी आहे, असे इराणला वाटत होते, असे या सूत्रांनी म्हटले आहे. सिरियाची हवाई सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी इराणने मोठा शस्त्रसाठा आणि उपकरणे अलेप्पो विमानतळावर उतरविली आहेत. दरम्यान, गेल्याच महिन्यात इस्रायलने सिरियाच्या अलेप्पो विमानतळावर भीषण हल्ले चढवून इराणचा मोठा शस्त्रसाठा नष्ट केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.