रशियाच्या जबरदस्त हल्ल्यांमुळे बाखमतमधून युक्रेनी लष्कराच्या माघारीला सुरुवात

ब्रिटनच्या संरक्षण विभागाचा दावा

Hot war continues around Bakhmutलंडन/किव्ह – रशियाकडून बाखमत शहरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण व जबरदस्त हल्ल्यांमुळे युक्रेनी लष्कराने शहरातून माघारीला सुरुवात केल्याचा दावा ब्रिटनच्या संरक्षण विभागाने केला. ब्रिटनच्या संरक्षण विभागाकडून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘इंटेलिजन्स अपडेट’मध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याचवेळी रशियाच्या संरक्षण विभागाने बाखमतमधील युक्रेनी फौजांना सर्व बाजूंनी कोंडीत पकडल्याचे म्हटले आहे. बाखमतच्या पश्चिम भागात युक्रेनचे १५ हजार जवान असल्याचा दावा करण्यात येतो.

Russia's heavy attacksपूर्व युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या बाखमतमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक प्रखर व भयावह होत चालल्याची माहिती समोर येत आहे. युक्रेनी नेते व अधिकारी बाखमतमध्ये लष्कर कोंडीत अडकल्याचे सांगून स्थिती नरकाप्रमाणे झाल्याची कबुली देत आहेत. मात्र राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की व त्यांच्या निकटर्तियांनी बाखमत अखेरपर्यंत लढविण्याचा निर्णय घेतल्याने लष्करी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दुसऱ्या बाजूला रशियातील खाजगी लष्करी कंपनी ‘वॅग्नर ग्रुप’, रशियासमर्थक बंडखोर गट व रशियाच्या संरक्षण विभागाकडून दर २४ तासांनी बाखमतबाबत नवी माहिती दिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच वॅग्नर ग्रुपच्या प्रमुखांनी बाखमतवर लीगल कंट्रोल मिळविल्याचा दावा केला होता. त्यानंतर रशियासमर्थक बंडखोरांच्या नेत्यांनी बाखमतला भेट दिल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ रशियन फौजांनी बाखमतवर हवाईहल्ले व रॉकेट हल्ले चढविल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली होती. बाखमतमधील छोटे रस्ते व भाग ताब्यात येत असल्याचेही रशियातील माध्यमांकडून सांगण्यात येत आहे.

trigger ukrainian troop-1या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या संरक्षण विभागाच्या ‘अपडेट’मध्ये केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो. शुक्रवारी १४ एप्रिलला प्रसिद्ध केलेल्या ‘इंटेलिजन्स अपडेट’मध्ये रशियाने बाखमतवरील हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढविल्याचे नमूद केले आहे. रशियन फौजा व ‘वॅग्नर ग्रुप’मध्ये सहकार्य दिसून येत आहे आणि गेल्या ४८ तासांमध्ये जबर हल्ले चढविण्यात आल्याचे अपडेटमध्ये म्हटले आहे.

वॅग्नर कंपनीचे ‘ॲसॉल्ट ग्रुप’ रस्त्यांवरील संघर्षात आघाडीवर आहेत, तर या गटाने जिंकलेल्या भागांवर रशियन फौजांनी नियंत्रण प्रस्थापित केले आहे. बाखमतमधील युक्रेनी फौजांना मिळणारी रसद जवळपास तुटली असून अनेक तुकड्यांना माघार घेणे भाग पडत आहे, असे ब्रिटनच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले. युक्रेनच्या नेतृत्त्वाने आतापर्यंत बाखमतमधील युक्रेनी फौजा माघार घेण्याचे मान्य करण्याचे नाकारले होते. मात्र ब्रिटनच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीमुळे आता ही बाब उघड झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पाश्चिमात्य देशांमधील विश्लेषक तसेच लष्करी तज्ज्ञांनी युक्रेनच्या बाखमतमधील धोरणांवर कोरडे ओढण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागात उघड झालेल्या ‘लीक’मध्येही युक्रेनच्या बाखमतमधील निर्णयांवर साशंकता व्यक्त करण्यात आली होती. बाखमतमधील संघर्षामुळे युक्रेन रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांची मोहीम राबवू शकेल का यावरही अमेरिकी वर्तुळात सवाल करण्यात येत आहेत.

leave a reply