इराणने येमेनमधील हौथींना शस्त्रास्त्रे पुरविली

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विश्‍लेषकांचा अहवाल

न्यूयॉर्क – गेल्या सहा वर्षांपासून इराण येमेनमधील हौथी बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरवून गृहयुद्ध भडकविण्याचे काम करीत आहे. इराणने हौथींसाठी केलेल्या शस्त्रतस्करीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरिक्षकांनी आपल्या अहवालात केला आहे. इराणची ही शस्त्रतस्करी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप राष्ट्रसंघाच्या निरिक्षकांनी केला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरिक्षकांनी तयार केलेला सदर अहवाल सुरक्षा परिषदेकडे सोपविण्यात आला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील व्यक्ती किंवा संघटना हौथी बंडखोरांना शस्त्रास्त्रांची तस्करी करीत आहे. इराणमधून हौथी बंडखोरांना रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, स्नायपर रायफल्स, रॉकेट प्रॉपेल्ड् ग्रिनेड लाँचर्स तसेच इतर शस्त्रास्त्रे पुरविली गेली. या सर्व शस्त्रास्त्रांवर इराणी बनावटीची मार्किंग असल्याचा पुरावा आहे. या व्यतिरिक्त इराण-हौथीमधील या बेकायदेशीर शस्त्रव्यवहारांचे इतरही बरेच पुरावे आपल्याकडे असल्याचे निरिक्षकांनी सदर अहवालात स्पष्ट केले.

इराणमधून शिडाच्या जहाजातून या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात होती. येमेनमध्ये गृहयुद्ध छेडणार्‍या गटांना शस्त्रतस्करी करण्यावर संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध घातले होते. पण यानंतरही इराणने हौथी बंडखोरांना शस्त्रास्त्रांचे सहाय्य करून निर्बंधांची पायमल्ली केल्याची टीका सदर अहवालात करण्यात आली आहे. हौथी बंडखोरांनी देखील येमेनमधील सरकारी खजिन्याचा वापर शस्त्रखरेदीसाठी केल्याचा आरोप निरिक्षकांनी सदर अहवालातून केला आहे. इराणने या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण याआधीही इराणने हौथी बंडखोरांना शस्त्रसज्ज केल्याचे आरोप फेटाळले होते.

इराण हौथी बंडखोरांसह हिजबुल्लाह, हमास व इराकमधील दहशतवादी गटांना शस्त्रसज्ज करीत असल्याचा आरोप अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच सौदी अरेबिया, युएई व इस्रायलने केले होते. ट्रम्प प्रशासनाने इराणवर निर्बंध लादण्याचा प्रयत्नही केला होता. पण पाश्‍चिमात्य देशांनी अमेरिकेचे हे प्रयत्न हाणून पाडले होते.

अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराण तसेच हौथी बंडखोरांबाबत वेगळी भूमिका स्वीकारली आहे. बायडेन प्रशासनाने हौथी बंडखोरांना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळण्याची तयारी केली आहे. तसेच येमेनमध्ये युद्ध पुकारल्याप्रकरणी सौदी अरेबिया व युएई यांना अमेरिकेकडून केला जाणारा शस्त्रपुरवठा रोखण्याची घोषणा बायडेन प्रशासनाने केली आहे.

दरम्यान, गेल्या सहा वर्षांपासून येमेनमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धात १,१२,००० जणांचा बळी गेला. तर सव्वा लाखाहून अधिक जणांवर उपासमारीचे संकट कोसळल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने वर्तविली आहे. येमेनमधील या संकटासाठी सर्वच गट जबाबदार असल्याचे ताशेरे संयुक्त राष्ट्रसंघाने याआधी ओढले होते.

leave a reply