इराण-युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा

तेहरान – इराण आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) परराष्ट्रमंत्र्यांमध्ये शनिवारी चर्चा पार पडली. यावेळी द्विपक्षीय आणि क्षेत्रीय सहकार्यावर विचारांचे आदानप्रदान केल्याची माहिती इराणने दिली. उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य सुदृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.

UAE foreign ministers discussदोन आठवड्यांपूर्वीच इराण आणि युएईने एकमेकांच्या देशात आपले दूतावास सुरू करण्याचे संकेत दिले होते. इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहयान आणि युएई परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल नह्यान यांच्यात फोनवरून चर्चा झाली. २०१६ साली सौदी अरेबियाने इराण बरोबरच्या संबंधातून माघार घेतल्यानंतर युएईने देखील त्याचे अनुकरण केले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासूनचे हे मतभेद बाजूला ठेवून नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवणे दोन्ही देशांच्या हिताचे असेल असे युएईचे परराष्ट्रमंत्री म्हणाले. गेल्या काही आठवड्यांपासून आखातामध्ये नव्याने सहकार्य प्रस्थापित होत आहेत याकडे अल-नह्यान यांनी लक्ष वेधले. इराण व सौदी अरेबियामध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि सिरियाला अरब लीगमध्ये पुन्हा सामावून घेण्याच्या प्रयत्नांचा उल्लेखही युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इराणने युएईमध्ये आपला राजदूत तैनात केला होता. तर युएईने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच इराणच्या राजधानीमध्ये आपल्या राजदूतांना रवाना केले होते.

leave a reply