तेहरान – रविवारपासून इराणच्या संरक्षणदलांचा ‘झुल्फीकार-१४००’ युद्धसराव सुरू झाला आहे. होर्मुझच्या आखातापासून रेड सीच्या क्षेत्रापर्यंत पसरलेला हा सराव म्हणजे इराणविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारणार्या शत्रूदेशांसाठी इशारा आहे, असे इराणच्या वरिष्ठ नौदल अधिकार्यांनी बजावले. गेल्याच आठवड्यात ओमानच्या आखातात अमेरिकेची विनाशिका व इराणच्या गस्तीनौका आमनेसामने आल्या होत्या. त्यानंतर इराणने दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो.
इराणचे लष्कर, नौदल, हवाईदल आणि हवाई सुरक्षा विभागाचा समावेश असलेला ‘झुल्फीकार-१४००’ सराव इराणच्या होर्मुझच्या आखातातून सुरू झाला. जवळपास दहा लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या सरावात इराणच्या नौदलाचा सर्वात मोठा सहभाग आहे. हेलिकॉप्टर्स तसेच ऍम्फिबियस युद्धनौकेच्या सहाय्याने शत्रूच्या किनारपट्टीवर दाखल होऊन कारवाई करण्याच्या सरावाचा यात समावेश आहे.
होर्मुझच्या आखातापासून सुरू होणारा हा सराव पुढे हिंदी महासागराचे उत्तरेकडील क्षेत्र व पुढे रेड सीच्या काही क्षेत्रात पार पडेल. या सरावात इराण स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांची चाचणी घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्याचबरोबर अतिप्रगत व हल्लेखोर ड्रोन्सचा वापर देखील या सरावात होणार आहे. इराणच्या नौदलाचे वरिष्ठ अधिकारी रेअर ऍडमिरल हबिबुल्लाह सय्यारी यांनी या सरावाची माहिती दिली.
‘इराणविरोधात कुठलीही आक्रमक पावले उचलली, तर त्याला तितक्याच आक्रमकतेने उत्तर दिले जाईल, हा इशारा इराण आपल्या शत्रूदेशांना या सरावाद्वारे देत आहे’, असे सय्यारी म्हणाले. इराणच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या सरावाकडे पाहिले जात असल्याची माहिती रेअर ऍडमिरल सय्यारी यांनी दिली.
३ नोव्हेंबर रोजी ओमानच्या आखाताजवळ अमेरिकेच्या विनाशिका आणि हेलिकॉप्टर्सनी इराणच्या इंधनवाहू टँकरवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला होता. पण इराणच्या नौदलाने हा हल्ला यशस्वीरित्या परतावल्याचा दावा इराणने केला होता. अमेरिकेने इराणचा हा आरोप धुडकावला होता. याआधीही पर्शियन आखात क्षेत्रात इराण व अमेरिकेच्या विनाशिका समोरासमोर आल्या होत्या.