लडाख सीमेवर भारताविरोधातील संघर्ष ही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची योजना

- चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेची कबुली

बीजिंग/नवी दिल्ली – भारत व चीनमध्ये ‘एलएसी’वर भडकलेला संघर्ष ही राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीच योजना होती, अशी कबुली चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली. ‘झिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर प्रसिद्ध केलेल्या एका लेखात, साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीबरोबरच भारताविरोधातील संघर्षाचा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी या मुद्यांवर वैयक्तिक पातळीवर हस्तक्षेप केल्याचे तसेच योजना आखण्यात पुढाकार घेतल्याचेही झिन्हुआने म्हटले आहे. याच पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही चीनबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, चीनकडून एलएसीवर करण्यात आलेल्या कारवायांचा उल्लेख करण्यात आला आहे.

लडाख सीमेवर भारताविरोधातील संघर्ष ही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची योजना - चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेची कबुलीझिन्हुआ या वृत्तसंस्थेने ‘शी जिनपिंग, द मॅन हू लीडस् सीपीसी ऑन न्यू जर्नी’ या नावाने स्वतंत्र लेख प्रसिद्ध केला आहे. यात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या यशस्वी कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे. यात ‘ईस्ट चायना सी’मधील गस्त, ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील आक्रमक भूमिका व चीन-भारत सीमेवरील संघर्ष या मुद्यांवर जिनपिंग यांनी आक्रमक नेतृत्त्व दाखविल्याचा दावा करण्यात आला. जिनपिंग यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून या सर्व मुद्यांवर नियोजन व मार्गदर्शन केल्याची बढाई चीनच्या वृत्तसंस्थेने मारली आहे.

यातील भारताच्या सीमेवरील संघर्षाचा उल्लेख लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. गेल्या वर्षी लडाखमधील ‘गलवान व्हॅली’सह इतर भागांमध्येही चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले होते. गलवान व्हॅलीमध्ये भारतीय लष्कराने दणका दिल्यानंतरही चीनच्या ‘पीएलए’कडून कारवाया सुरुच होत्या. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी चाललेल्या चर्चेत चीनकडून वारंवार भारतावर घुसखोरीचे आरोप करण्यात येत होते. सीमेवरील तणाव भारताच्या कारवायांमुळेच वाढला, असा दावा चिनी अधिकारी व माध्यमांकडून करण्यात येत होता.

मात्र चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यामुळे चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भारत व चीन संघर्षात आंतरराष्ट्रीय समुदायानेही भारताची बाजू घेतली होती. त्यामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाल्याचेही समोर आले होते.

leave a reply