तेहरान – बायडेन प्रशासनाच्या धोरणांवर नाराज असलेले आखाती देश इस्रायलसह अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी देशांशी हातमिळवणी करीत आहेत. यामुळे सावध झालेल्या बायडेन प्रशासनाने इराणबरोबरील अणुकराराची चर्चा रोखून इस्रायल व अरब देशांना आश्वस्त करण्याच्या प्रयत्नांना वेग दिल्याचे संकेत मिळत आहे. याची दखल घेऊन इराणने बायडेन प्रशासनाला धमकावले असून आपण अणुकरारासाठी फार काळ वाट पाहणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे.
व्हिएन्ना येथील वाटाघाटींना यश मिळाले असून अमेरिका व इराण अणुकराराच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे युरोपिय महासंघाने दहा दिवसांपूर्वी जाहीर केले होते. बायडेन प्रशासन आणि इराणने देखील व्हिएन्ना येथील बैठकीसाठी आपापले प्रतिनिधी रवाना करून अणुकरार पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पण या वाटाघाटी अजूनही पूर्ण झाल्या नसून बायडेन प्रशासनाने अणुकरारावरील अंतिम टप्प्यातील चर्चा रखडवल्याचा आरोप इराण करीत आहे.
‘अमेरिका आपल्या जबाबदार्या योग्यरित्या पार पाडत नाही’, असा ठपका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी ठेवला. ‘अंतर्गत कारणांमुळे बायडेन प्रशासनाने हा अणुकरार ओलिस धरला आहे. पण इराण फार काळ वाट पाहणार नाही. अमेरिकेने याबाबत राजकीय निर्णय घ्यावा’, असे सांगून खाबितझादेह यांनी अमेरिकेवर दबाव टाकला.
‘या रखडलेल्या चर्चेसाठी अमेरिका जबाबदार असून पुढचे काही दिवस ही चर्चा प्रलंबित राहू शकते’, अशी चिंता खाबितझादेह यांनी व्यक्त केली. तर व्हिएन्ना येथील बैठकीत युरोपिय महासंघाने मान्य केलेल्या मागण्यांना अमेरिकेने देखील समर्थन द्यावे. असे झाले तरच व्हिएन्ना येथील अंतिम अणुकरारासाठी इराण दाखल होईल. इराण यापुढे कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करणार नाही’, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला.
पण त्याचबरोबर या अणुकरारासाठी इराण आपल्या ‘रेड लाईन्स’ ओलांडणार नाही किंवा आपल्या मागण्या कमी करणार नसल्याचे खातिबझादेह यांनी ठणकावले. व्हिएन्ना येतील अणुकरारावरील प्रस्तावात इराणने रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती. बायडेन प्रशासनाने ही मागणी मान्य केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण त्यानंतर इस्रायल व आखाती देशांनी यावर नाराजी व्यक्त केली.
अमेरिका इराणबरोबर करीत असलेल्या अणुकरारामुळे आखाती देशांमधील असुरक्षिततेची भावना अधिकच बळावली आहे. यामुळे अरब देशांनी अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी असलेल्या रशिया, चीन या देशांशी हातमिळवणी सुरू केली आहे. तसेच इंधनाच्या मुद्यावर रशियाच्या विरोधात जाण्यास आखाती देशांनी अमेरिकेला स्पष्टपणे नकार दिला. यामुळे बायडेन प्रशासनाला इस्रायल व अरब देशांना आश्वस्त करावे लागत आहे. तर दुसरीकडे इराण व्हिएन्ना येथील चर्चेतून माघार घेण्याची धमकी देत आहे. यामुळे बायडेन प्रशासन सध्या कोंडीत सापडल्याचे दिसत आहे.