दक्षिण कोरियाच्या चिथावणीला अणुहल्ल्याने उत्तर मिळेल

- उत्तर कोरियाची दक्षिण कोरियाला धमकी

सेऊल – ‘कोरियन क्षेत्रात आणखी एक युद्ध पेटावे, अशी उत्तर कोरियाची इच्छा नाही. पण दक्षिण कोरियाने आमच्यावर पहिला हल्ला चढविला तर मात्र उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांनी या हल्ल्याला उत्तर देईल. या हल्ल्यानंतर दक्षिण कोरियाचे लष्कर संपूर्ण विनाशाजवळ पोहोचेल’, अशी धमकी उत्तर कोरियन हुकूमशाहीतील प्रभावशाली व्यक्ती किम यो जॉंग यांनी दिली. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांची बहिण असलेल्या यो यांनी गेल्या तीन दिवसात दुसर्‍यांदा दक्षिण कोरियाला धमकावले आहे. दरम्यान, उत्तर कोरियापासून अमेरिका आणि अमेरिकेच्या सहकारी देशांना खर्‍या अर्थाने धोका असल्याचे अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी म्हटले आहे.

अणुहल्ल्याने उत्तर मिळेलदक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सुह वूक यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी आपल्या देशाच्या लष्कराकडे असलेल्या सामर्थ्याबाबत मोठी घोषणा केली होती. उत्तर कोरियावर अचूक हल्ला तसेच वेगाने आणि दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियन लष्कराकडे असल्याचा दावा संरक्षणमंत्री वूक यांनी केला होता.

तसेच उत्तर कोरियाच्या संभाव्य हल्ल्याआधीच आपल्या शेजारी देशाचे लष्करी सामर्थ्य क्षीण करण्यासाठी पहिला हल्ला चढविण्याची क्षमता असल्याचे वूक यांनी जाहीर केले होते. गेल्या महिन्यातही दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी उत्तर कोरियावर अशा हल्ल्याची घोषणा केली होती.

पण गेल्या आठवड्यात वूक यांनी दिलेल्या या इशार्‍यानंतर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर थेट अणुहल्ला चढविण्याची धमकी दिली आहे. दक्षिण कोरियाचे सरकार उत्तर कोरियावर पहिला हल्ला चढविण्याचे सुंदर दिवास्वप्न पाहत असून हा त्यांचा उन्माद आहे, अशी टीका किम यो जॉंग यांनी केली. असे झालेच तर उत्तर कोरिया दक्षिण कोरियावर थेट अणुहल्ला चढविल, अशी धमकी यो जॉंग यांनी दिली. दक्षिण कोरियाचे लष्कर या अणुहल्ल्याच्या निशाण्यावर असतील, असा इशारा उत्तर कोरियन हुकूमशहांच्या बहिणीने दिला.

अणुहल्ल्याने उत्तर मिळेलगेल्याच महिन्यात उत्तर कोरियाने अमेरिकेच्या कारवाया ‘डेंजर लाईन’पर्यंत पोहोचल्याचा ठपका ठेवून अमेरिकेला नव्या अणुचाचण्यांची धमकी दिली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच उत्तर कोरियाने थेट अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरांचा वेध घेणार्‍या ‘हॅसॉंग-१७’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.

दक्षिण कोरिया आणि जपानच्या लष्करी विश्‍लेषकांच्या मते, हॅसॉंग-१७ क्षेपणास्त्र १५,००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. अमेरिकेने या चाचणीची गंभीर दखल घेऊन उत्तर कोरियावर नव्या निर्बंधांची घोषणा केली होती.

दरम्यान, मंगळवारी किम यो जॉंग यांनी दक्षिण कोरियावर अणुहल्ला चढविण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिकेकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. उत्तर कोरियाचा आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिका तसेच अमेरिकेच्या सहकारी देशांसाठी धोकदायक असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी म्हटले आहे. तर उत्तर कोरियापासून अमेरिकेला कायमस्वरुपी धोका असल्याचा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला.

leave a reply