दहशतवादी हल्ल्याच्या कटाप्रकरणी इराणच्या राजनैतिक अधिकार्‍याला बेल्जिअममध्ये शिक्षा

ब्रुसेल्स – फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयोजित सभेत स्फोटके पेरून मोठा हल्ला घडविण्याचा कट आखणार्‍या ऑस्ट्रियातील इराणच्या राजनैतिक अधिकार्‍याला २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बेल्जिअमच्या न्यायालयाने बुधवारी ही घोषणा केली. पण आपल्या राजनैतिक अधिकार्‍यावर खटला चालविण्याचा बेल्जिअमला अधिकार नसल्याची टीका इराणने केली आहे. तसेच या राजनैतिक अधिकार्‍याला इराणच्या हवाली करण्याची मागणीही केली आहे.

इराणमधील राजवटीचे कडवे विरोधक आणि युरोपिय देशांमध्ये आश्रय घेतलेल्या इराणी जनतेच्या ‘नॅशनल काऊन्सिल ऑफ रेझिस्टन्स इन इरान’ (एनसीआरआय) या संघटनेकडून दरवर्षी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मोठ्या सभेचे आयोजन केले जाते. एनसीआरआयच्या नेत्या मरियम रजावी या सभांमधून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी व रिव्होल्युशनरी गार्ड्सला लक्ष्य करतात. या सभेत अमेरिका व युरोपमधील नेते देखील सहभागी होत असतात. त्यामुळे एनसीआरआयच्या या सभेला फार मोठे महत्त्व दिले जाते.

२०१८ साली आयोजित सभेत मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट ऑस्ट्रियातील इराणच्या दूतावासातील राजनैतिक अधिकारी अस्सादोल्ला अस्सादी याने कट आखला होता. यासाठी अस्सादीने अर्धा किलो वजनाची स्फोटके आणि डिटोनेटरचा बंदोबस्तही केला होता. बेल्जिअम नागरिक असलेल्या नसिमेह नामी आणि अमिर सादौनी तसेच मेहरदाद अरेफानी यांच्यासह या हल्ला घडविण्याचा कट अस्सादीने रचला होता.

युरोपमधील वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणांनी या कटाची माहिती बेल्जिअमच्या सुरक्षा यंत्रणेला पुरविली. त्यावर बेल्जिअमच्या सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत एका कारमधून स्फोटके तर अस्सादीला जर्मनीतून ताब्यात घेतले. अस्सादीने राजनैतिक अधिकारांचा वापर करून जर्मनीत आश्रय घेण्याची तयारी केली होती. पण जर्मनीने त्याची ही मागणी फेटाळली होती. अस्सादीसह त्याच्या तीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आली. पुढे बेल्जिअमच्या सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीतून अस्सादी इराणच्या गुप्तचर यंत्रणेचा एजंट असल्याचे उघड झाले होते.

दरम्यान, बेल्जिअमच्या न्यायालयाने सुनावलेली शिक्षा अस्सादीने मान्य केली आहे. पण ब्रुसेल्समधील इराणच्या दूतावासाने अस्सादीची अटक व त्याला झालेल्या शिक्षेवर टीका केली आहे. व्हिएन्ना करारानुसार, राजनैतिक अधिकार्‍यांवर खटला चालविला जाऊ शकत नसल्याचे इराणचे म्हणणे आहे.

leave a reply