आखातात इराणची अरेरावी वाढत आहे

- सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची टीका

इराणची अरेरावीरियाध – ‘आखाती क्षेत्रातील इराणची अरेरावी अधिकच वाढली असून याचा परिणाम या क्षेत्रातील सुरक्षेवर होत आहे’, अशी जळजळीत टीका सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहात अल सौद यांनी केली. सागरी वाहतुकीच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका, येमेनमधील हौथींची शस्त्रसज्जता आणि लेबेनॉनमध्ये राजकीय कोंडी, याचे दाखले परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी दिले. त्याचबरोबर २०१५ सालचा अणुकरार इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून पूर्णपणे रोखणारा असेल तरच सौदी या कराराचे समर्थन करील, असे सांगून सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली.

अमेरिकेतील आघाडीच्या सुरक्षाविषयक अभ्यासगटाने आयोजित केलेली ‘ऍस्पेन सिक्युरिटी फोरम’ची व्हर्च्युअल बैठक नुकतीच पार पडली. या तीन दिवसांच्या बैठकीला संबोधित करताना सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी आखातातील सुरक्षाविषयक आव्हानांवर चिंता व्यक्त केली. युएईच्या इंधनवाहू जहाजाच्या अपहरणामागे इराण समर्थक गट असल्याचा उल्लेख करून या क्षेत्रातील इराणची वाढती अरेरावी येथील सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा प्रिन्स फैझल यांनी दिला.

‘येमेनमधील हौथी बंडखोरांना शस्त्रपुरवठा असो किंवा सागरी क्षेत्रातील वाहतूक असुरक्षित करण्याचा प्रयत्न असो, आखातातील इराणच्या नकारात्मक कारवाया अधिक तीव्र झाल्या आहेत. अगदी गेल्या कित्येक महिन्यांपासून लेबेनॉनमधील राजकीय कोंडी आणि आर्थिक दूरावस्थेलाही इराणच जबाबदार आहे’, असा ठपका सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला. इस्रायल आणि युएईच्या जहाजांवरील हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचे आरोप तीव्र होऊ लागले आहेत. याबाबत बोलताना सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युएईच्या इंधनवाहू जहाजाच्या अपहरणामागे इराण असल्याचा संशय व्यक्त केला.

इराणची अरेरावीपाश्‍चिमात्य देश आणि इराणमध्ये सुरू असलेल्या अणुकराराबाबतची सौदीची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केली. ‘इराणबरोबरच्या अणुकरारासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सौदीचा पाठिंबा आहे. पण या अणुकरारामुळे इराणला कायमस्वरुपी अण्वस्त्रसज्जतेपासून रोखता येणार असेल तरच’, ही सौदीची पूर्वअट असल्याचे प्रिन्स फैझल यांनी लक्षात आणून दिले. ‘आखातातील स्थैर्यासाठी इराणबरोबर सहकार्य करण्यासाठी देखील सौदी तयार आहे. पण त्याआधी इराणने दहशतवादी संघटना, सशस्त्र गटांना शस्त्रास्त्रे पुरविणे आणि अण्वस्त्रनिर्मिती थांबवावी’, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी इराणला लक्ष्य केले.

गेल्या वर्षी अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि अरब देशांमध्ये झालेल्या अब्राहम कराराचे सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी समर्थन केले. ‘अब्राहम करारामुळे या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे या कराराकडे सकारात्मकतेने पाहता येऊ शकते’, असे प्रिन्स फैझल म्हणाले. पण या कराराचा वापर पॅलेस्टाईनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, इब्राहिम रईसी यांनी काही तासांपूर्वीच इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. आधीचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्यापेक्षा रईसी खूपच जहालमतवादी असल्याचे दावे केले जातात. या पार्श्‍वभूमीवर, सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऍस्पेन बैठकीच्या माध्यमातून इराणच्या कारवायांवरून आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply