तेहरान – हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या 25 जणांना इराणच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तर 400 निदर्शकांना तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबच इराणने आणखी एका निदर्शकाला फाशी दिल्याची बातमी आली आहे. तसेच निदर्शकांना समर्थन देणाऱ्या फुटबॉलपटू आणि अभिनेत्यालाही फाशी होणार असल्याचा दावा केला जातो. याचे जगभरात पडसाद उमटत असून अमेरिकेने इराणवर गंभीर आरोप केले आहेत. ‘इराणच्या जनतेने पुकारलेल्या आंदोलनाला या देशाचे नेतृत्त्व घाबरले आहे, म्हणूनच ते निदर्शकांना फासावर चढवित आहेत. इराणच्या जनतेने खचून जावे, यासाठी हे सारे सुरू आहे’, असा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला.
इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. हिजाबसक्तीच्या विरोधात पेटलेले हे आंदोलन म्हणजे राजवटीच्या विरोधात भडकविलेली दंगल असल्याचा आरोप करुन निदर्शकांना दहशतवादी ठरविले. सदर आंदोलन चिरडण्यासाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत किमान 490 जणांचा बळी गेला असून यामध्ये 68 मुलांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. तर इराणने याप्रकरणी 18,200 जणांना ताब्यात घेतल्याचा आरोप मानवाधिकार संघटनेने केला होता.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी दिलेल्या आदेशानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून इराणच्या रिव्होल्युशनरी न्यायालयाने अटकेतील निदर्शकांना शिक्षा सुनाविण्यास सुरुवात केली आहे. इराणने गेल्या दोन आठवड्यांमध्ये दोन निदर्शकांना फाशी दिली असून प्रसिद्ध फुटबॉलपटू अमिर रेझा नस्र अझादानी याला देखील लवकरच फाशी होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अझादानीवर निदर्शकांना समर्थन तसेच सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
अझादानीला सुनावलेल्या शिक्षेची आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंच्या युनियनने दखल घेत इराणवर टीका केली. जगभरातूनही इराणमध्ये निदर्शकांवर सुरू असलेल्या कारवाईवर ताशेरे ओढले जात आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी इराणची राजवट आपल्याच जनतेवर अमानवी अत्याचार करीत असल्याचा आरोप केला. जनतेच्या निदर्शनांमुळे इराणची राजवट भयभीत झाली असून त्यातूनच निदर्शकांवर ही कारवाई सुरू असल्याचा दावा प्राईस यांनी केला.
विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकारांबरोबरच इराणची राजवट निदर्शकांसाठी कायदेशी लढा देणाऱ्या वकिलांवर देखील कारवाई करीत असल्याचे समोर आले आहे. इराणच्या यंत्रणांनी चार वकिलांना ताब्यात घेतले असून इतरांना धमकावल्याची बातमी अमेरिकी वृत्तवाहिनीने दिली. इराणमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या सुन्नीपंथियांच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांनी निदर्शकांची बाजू घेतली आहे. इराणच्या राजवटीने निदर्शकांचे म्हणणे ऐकून न घेता कारवाई केली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे या सुन्नीपंथियांच्या नेत्यांनी धमकावले आहे.
दरम्यान, ब्रिटन, फ्रान्स व युरोपिय महासंघाने निदर्शकांवरील कारवाईचा निषेध करून इराणमधील सरकार, रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित 30 हून अधिक जणांवर निर्बंध जाहीर केले आहेत. तर इराणने देखील ब्रिटन व इतर युरोपिय देशांच्या राजदूतांना समन्स बजावले आहेत. इराणमधील या अस्थैर्यासाठी पाश्चिमात्य देश जबाबदार असल्याचा ठपका इराणने ठेवला आहे.
हिंदी