जेरूसलेम – गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने हवाई हल्ले चढवून गाझापट्टीतील हमासची महत्त्वाची ठिकाणे बेचिराख केली. हमासची गाझातील पॅलेस्टिनींवरील पकड ढिली पडत चालल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे इस्रायलवर हल्ले चढवून हमास आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केला जातो. पण याचे विपरित परिणाम गाझापट्टीला सहन करावे लागत असल्याचे इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यात जेरूसलेम शहरात प्रवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मार्गांवर बॉम्बस्फोट घडविण्यात आले. यामध्ये आपल्या नागरिकांचा बळी गेल्यानंतर इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत किमान सात संशयितांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर आठवड्याभर चाललेल्या या कारवाईत किमान १० पॅलेस्टिनींचा बळी गेल्याचा दावा केला जातो.
वेस्ट बँकमधील या कारवाईवर युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच इस्रायली सुरक्षादलांच्या कारवाईची चौकशी करण्याची मागणी केली होती. याला चोवीस तासही उलटत नाही तोच गाझातील हमासने इस्रायलच्या दिशेने रॉकेट हल्ले चढविले.
शनिवारी संध्याकाळी इस्रायलच्या दक्षिणेकडील नहाल ओझ आणि कफार अझा या दोन भागात रॉकेट कोसळले. त्यानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी रात्री एक वाजता गाझातील हमासच्या रॉकेट निर्मितीचा कारखाना आणि भुयारीमार्ग अशा दोन ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले. यात रॉकेट निर्मितीचा कारखाना बेचिराख झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला. हमासच्या ‘कासेम ब्रिगेड’ने इस्रायलच्या हवाई हल्ल्यांची कबुली दिली. तसेच इस्रायली विमानांना पिटाळण्यासाठी आपण हवाई हल्ले चढविल्याचाही दावाही कासेम ब्रिगेडने केला आहे.
गाझातून चढविलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये इस्रायलची कुठलीही हानी झालेली नाही. पण या निमित्ताने नवी माहिती समोर येत आहे. हमासने गाझापट्टीचा ताबा घेतल्यानंतर १५ वर्षे उलटली आहेत. त्यानंतर १२ टक्के पॅलेस्टिनींनी हा भूभाग सोडल्याचा दावा ‘काऊन्सिल ऑन इंटरनॅशनल रिलेशन्स-सीआयआर’ या संस्थेने केला. पण ही संस्था सांगत आहे, त्याहूनही अधिक प्रमाणात गाझातून स्थलांतरीत झालेल्या पॅलेस्टिनींची मोठी असल्याचा दावा केला जातो.
त्यातच गाझा तसेच वेस्ट बँकमध्ये हमासपेक्षा इस्लामिक जिहादचा प्रभाव वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या हमासने इस्रायली सुरक्षादलांच्या वेस्ट बँकमधील कारवाईचे कारण पुढे करत इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले. गाझापट्टीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व वाढविण्यासाठी हमास या कारवाया करीत असल्याचे दिसते. पण पॅलेस्टिनी जनता आधीप्रमाणे हमासला प्रतिसाद देत नसल्याचे दावे केले जातात. त्यातच इस्लामिक जिहाद व इतर पॅलेस्टिनी संघटनांशी हमासला स्पर्धा करावी लागत असून त्यात हमास मागे पडल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत हमास आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलवर घणाघाती हल्ले चढविल, अशी चिंता इस्रायलमधील माध्यमे व्यक्त करीत आहेत.