फुटबॉल वर्ल्डकप सुरू असेपर्यंत गाझातून इस्रायवर हल्ले चढवू नका

- कतारने हमास, इस्लामिक जिहादला बजावले

फुटबॉल वर्ल्डकपतेल अविव – कतारमधील फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा पार पडेपर्यंत हमास व इस्लामिक जिहादने शांत रहावे, गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले चढवू नये, अशी ताकीद कतारने दिली आहे. दोन दिवसांपूर्वी इस्रायली सुरक्षादलांनी वेस्ट बँकमध्ये केलेल्या कारवाईत इस्लामिक जिहादचे दोन दहशतवादी ठार झाले होते. याचा सूड घेण्यासाठी सदर दहशतवादी संघटना गाझापट्टीतून इस्रायलवर भीषण रॉकेट हल्ले चढविण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्याविरोधात कतारने गाझातील दोन्ही दहशतवादी संघटनांना हा इशारा दिला आहे.

इंधनाने समृद्ध असलेला कतार हा गाझापट्टीला आर्थिक सहाय्य पुरविणारा सर्वात महत्त्वाचा आखाती देश आहे. कतारच्या राजघराण्याचे गाझातील हमासच्या नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत. कतार आणि इस्रायलमध्ये अधिकृत पातळीवर राजकीय संबंध नसले तरी दोन्ही देशांमध्ये सहकार्य असल्याचे याआधी उघड झाले होते. २०१८ साली इस्रायलच्या परवानगीनंतरच कतारने गाझापट्टीतील वीजप्रकल्प, पायाभुत सुविधा, स्थानिक प्रशासनाचा खर्च तसेच हजारो पॅलेस्टिनींसाठी लाखो डॉलर्सचे सहाय्य पुरविले होते. तर इस्रायल व हमासमध्ये संघर्षबंदी घडविण्यासाठीही कतारने पुढाकार घेतला होता.

फुटबॉल वर्ल्डकपफिफा फुटबॉल स्पर्धेची सुरुवात होण्याआधी कतारचे राजदूत मोहम्मद अल-इमादी यांनी गाझापट्टीचा दौरा करून हमास व त्यानंतर इस्लामिक जिहादच्या नेत्यांशी भेट घेतल्याचे इस्रायली वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या भेटीतच अल-इमादी यांनी हमास व इस्लामिक जिहादच्या नेत्यांना कतारमधील स्पर्धा सुरू असेपर्यंत इस्रायलवर रॉकेट हल्ले चढवू नका, असे बजावले. हमास किंवा इस्लामिक जिहादने इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले तर जगाचे लक्ष या स्पर्धेपासून हटेल, अशी चिंता कतारला वाटत असल्याचा दावा इस्रायली वृत्तसंस्थेने केला.

गेल्या दीड वर्षात हमास व इस्लामिक जिहादने गाझातून इस्रायलवर हजारो रॉकेट्सचा वर्षाव केला आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलनेही या दोन्ही दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविले होते. या संघर्षानंतर वेस्ट बँकमध्येही हमास व इस्लामिक जिहादच्या समर्थकांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात वेस्ट बँकमधील कट्टरपंथियांकडून इस्रायली जनता व सुरक्षादलांवर हल्ले चढविण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी वेस्ट बँकमध्ये इस्रायली सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत दोन जण ठार झाले. यामध्ये इस्लामिक जिहादचा मोठा कमांडर नईम झुबैदी या दहशतवाद्याचा समावेश आहे.

यानंतर गाझातून इस्रायलवर पुन्हा एकदा रॉकेट्सचा वर्षाव सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. गाझातून या रॉकेट हल्ल्यांना लेबेनॉनमधील हिजबुल्लाहकडूनही समर्थन मिळेल, असा दावा केला जात होता. असे झाल्यास इस्रायल, गाझा व लेबेनॉनमध्ये मोठा संघर्ष भडकून यात इराण देखील उडी घेईल, असा इशारा इस्रायली विश्लेषकांनी दिला होता. पण त्याआधीच कतारने हमास व इस्लामिक जिहादला शांत राहण्याची सूचना केल्याचे समोर येत आहे.

१८ डिसेंबर रोजी कतारमधील ही फुटबॉल स्पर्धा संपणार असून त्यानंतर गाझातून इस्रायलवर रॉकेट हल्ले होऊ शकतात, याकडे इस्रायली विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

हिंदी

leave a reply