येमेनमधील हौथी बंडखोरांच्या हल्ल्याचा धोका वाढल्याने इस्रायलच्या दक्षिण सीमेवर क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात

इलॅट – कासेम सुलेमानींच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण येमेनमधील हौथी बंडखोरांचा वापर करू शकतो. हौथी बंडखोरांनी देखील थेट इस्रायलवर हल्ले चढविण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आपल्याकडे असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलच्या लष्कराने ‘आयर्न डोम’ आणि ‘पॅट्रियॉट’ या दोन क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा दक्षिण इस्रायलच्या इलॅट भागात तैनात केल्या आहेत. इस्रायली वृत्तवाहिनीने इलॅटमधील या तैनातीचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत.

इराण आपला प्रभाव असलेल्या इराक आणि येमेन या आखाती देशांचा वापर करून इराण इस्रायलवर हल्ले चढवू शकतो. याची माहिती आपल्याकडे असल्याचे इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल हिदाई झिल्बरमन यांनी दोन आठवड्यांपूर्वी म्हटले होते. यासाठी इराणचे लष्कर, इराक किंवा येमेनमधून इस्रायलपर्यंत मारा करू शकणारी स्मार्ट क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा वापर करील, असा दावा झिल्बरमन यांनी सौदी अरेबियाच्या दैनिकाशी बोलताना केला होता.

या दरम्यान, येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या सीमाभागावर हल्ले चढविले होते. या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारताना, आवश्यकता पडल्यास आपली क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दक्षिणेकडील शहरांना लक्ष्य करतील, असा इशारा हौथी बंडखोरांनी दिला होता. वर्षभरापूर्वी हौथींनी सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. सौदीमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या पॅट्रियॉट या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने सदर क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या भेदली होती. यामुळे हौथींकडे रॉकेट्सप्रमाणेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे असल्याचेही उघड झाले होते. सौदीने आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर याचे पुरावे सादर केले होते. तसेच इराण हौथींना ही क्षेपणास्त्रे पुरवित असल्याचा आरोप सौदीने केला होता.

त्यामुळे हौथींकडून होणार्‍या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलच्या लष्कराने इलॅट शहरात आयर्न डोम आणि पॅट्रियॉट या दोन क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात केल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला आहे. या वृत्तवाहिनीने सदर यंत्रणांचे फोटोग्राफ्स देखील प्रसिद्ध केले आहेत. इस्रायली लष्कराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

आयर्न डोम ही इस्रायलनिर्मित हवाई सुरक्षा यंत्रणा आहे. या यंत्रणेचा वापर रॉकेट्स, मॉर्टर्स, छोटे ड्रोन्स आणि क्रूझ् क्षेपणास्त्रांना भेदण्यासाठी केला जातो. तर अमेरिकन बनावटीच्या पॅट्रियॉटचा वापर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आणि मोठे ड्रोन्स यांचे हल्ले भेदण्यासाठी होतो. त्यामुळे इलॅटमध्ये या दोन्ही यंत्रणा तैनात करून इस्रायलने मोठी तयारी केल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. गेल्याच महिन्यात इस्रायलने आपली पाणबुडी पर्शियन आखाताच्या दिशेने रवाना केली होती. ब्रिगेडिअर जनरल झिल्बरमन यांनी याबाबत बोलताना, इस्रायलच्या पाणबुड्या सर्वत्र शांतपणे संचार करीत आहेत आणि इराणच्या प्रत्येक हालचालींवर इस्रायलच्या पाणबुड्यांची नजर असल्याचा इशारा दिला होता.

leave a reply