व्हिएन्ना/जेरूसलेम – इराणच्या अणुकार्यक्रमावरील हल्ला बेकायदेशीर ठरेल, असा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे (आयएईए) महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी केला होता. त्यावर इस्रायलच्या पंतप्रधानांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. इराण आमच्या कत्तलीसाठी हत्यारांची जमवाजमव करीत असताना आम्हाला स्वसंरक्षणाचाही अधिकार नाही का? असा सवाल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी विचारला आहे. त्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्यावर इस्रायल ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
शनिवारी आयएईएचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी तेहरानमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी इराण व आयएईएमार्फत संयुक्त निवेदन देखील प्रसिद्ध करण्यात आले. त्याचा दाखला देऊन आपल्या अणुकार्यक्रमाबाबत आयएईएकडून नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांचे निराकरण झाल्याचा दावा इराण करीत आहे. तर इराणने आपल्या अणुप्रकल्पात बंद केलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. तसेच आयएईएच्या इतर मागण्या देखील इराणने मान्य केल्याचे सांगितले जाते. तेहरानमधील पत्रकार परिषदेत आयएईएचे महासंचालक ग्रॉसी यांना इराणच्या अणुप्रकल्पावर इस्रायलच्या संभाव्य हल्ल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
याला उत्तर देताना इराणच्या अणुप्रकल्पावरील लष्करी हल्ला बेकायदेशीर असेल, असे ग्रॉसी म्हणाले. त्यांच्या या विधानावर इस्रायलच्या पंतप्रधानांनी आक्षेप घेतला. इराणने इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याचे इशारे दिले होते. इराण आमची कत्तल करण्यासाठी हालचाली करीत असून यासाठी हत्यारांची जमवाजमव करीत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला स्वसंरक्षणाचाही अधिकार नाही का? असा जळजळीत सवाल पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला.
होय! आम्हाला हा अधिकार आहे व इस्रायल त्याचा प्रयोग नक्कीच करील. कायदा काय आहे आणि कायदेशीर काय आहे, यावर गंभीपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. इस्रायलचा सर्वनाश करण्यासाठी हालचाली करण्याची परवानगी कुठला कायदा देतो, असा आणखी एक प्रश्न पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला. तसेच आयएईएच्या महासंचालकांनी केलेली विधाने म्हणजे योग्य पदावर बसलेल्या व्यक्तीने केलेली अनुचित विधाने ठरतात, असा शेरा देखील इस्रायलच्या पंतप्रधानांनी मारला आहे.
दरम्यान, इराण अण्वस्त्रसज्जतेच्या खूपच समीप असल्याचा दावा ‘आयएईए’च्या एका अहवाला करण्यात आला होता. लवकरच इराण अणुबॉम्बसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात युरेनियमचे संवर्धन करू शकतो, असा इशारा या अहवालात देण्यात आला होता. पण आता मात्र आयएईएची भाषा बदलल्याचे दिसत आहे. याची गंभीर दखल इस्रायलने घेतली असून पुढच्या काळात इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला करताना आपण कायद्याच्या चौकटीचा विचार करणार नाही, असा संदेश इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला आहे. केवळ आयएईएच नाही तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी हे देश देखील इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला चढवू नये, यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करीत आहेत. पण इराणपासून आपल्या अस्तित्त्वाला असलेला धोका लक्षात घेता, इस्रायल त्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही, असे आक्रमक बनलेले पंतप्रधान नेत्यान्याहू व त्यांचे सहकारी बजावत आहेत.