इस्रायलला इराणची नवी धमकी

नवी धमकीदुबई – ‘इस्रायलच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील संघर्ष म्हणजे दडपशाही आणि दहशतवादाविरोधातील संघर्ष आहे. इस्रायल राष्ट्र नसून दहशतवाद्यांचा तळ आहे. त्यामुळे या राजवटीविरोधातील संघर्षात सहभागी होणे ही जनतेची जबाबदारी ठरते. जेरूसलेमच्या स्वातंत्र्यासाठी इस्लामधर्मिय देशांनी इराणला सहकार्य केले तर इस्रायलसाठी ते दु:स्वप्न ठरेल’, असा इशारा इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी दिला. तर एकाच लष्करी हल्ल्यात इस्रायल नष्ट होईल, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी दिली आहे.

याआधी इराणने इस्रायलच्या विनाशाच्या, इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याच्या धमक्या दिल्या होत्या. पण गेल्या काही आठवड्यांपासून या क्षेत्रात सुरू असलेल्या घडामोडींची तीव्रता पाहता, इराण आणि इस्रायलकडून दिल्या जाणार्‍या धमक्यांचे गांभीर्य वाढले आहे. इस्रायलची लढाऊ विमाने थेट इराणपर्यंत धडकू शकतात, असा इशारा इस्रायलच्या गुप्तचर मंत्रालयाच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी दिला. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन इस्रायलच्या दौर्‍यावर असताना देखील, इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, अशी आपल्या सरकारची ठाम भूमिका असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी ठणकावले होते.

इराणकडूनही इस्रायलला धमक्या दिल्या जात आहेत. युरेनियमचे संवर्धन वाढवून इराण इस्रायलचे दोन्ही हात छाटून टाकील, अशी धमकी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिली होती. इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कानी यांनी इस्रायल सुरक्षित राहणार नसल्याची घोषणा केली होती. यामध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलला दिलेल्या धमकीची भर पडली आहे. शुक्रवारी राजधानी तेहरानमधून इराणी जनतेला संबोधित करताना खामेनी यांनी इस्रायलच्या विरोधातील संघर्षात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

‘ज्या दिवशी इस्रायलने पॅलेस्टिनींच्या भूभागाचा ताबा घेतला, तेव्हापासून या भागात दहशतवाद्यांचे तळ उभारले. इस्रायल हे राष्ट्र नसून पॅलेस्टिनी आणि इतर मुस्लिम देशांविरोधात उभारलेला दहशतवाद्यांचा किल्ला आहे. या दुष्ट राजवटीच्या विरोधातील संघर्ष म्हणजे दडपशाही आणि दहशतवादाच्या विरोधातील संघर्ष ठरतो व या संघर्षात सहभागी होणे हे जनतेचे कर्तव्य आहे’, असे आवाहन खामेनी यांनी केले.

नवी धमकीइराणच्या सर्वोच्च धर्मगुरुंनी इस्रायलचे समर्थन करणार्‍या पाश्‍चिमात्य देशांवरही ताशेरे ओढले. ‘दुसर्‍या महायुद्धात युरोपने ज्यूधर्मियांवर अत्याचार केले, म्हणून आत्ता युरोपिय देश आंधळेपणाने त्यांचे समर्थन करीत आहेत. याचा सूड घेण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांनी पॅलेस्टिनींना त्यांच्या भूभागातून बाहेर काढले’, असा आरोप खामेनी यांनी केला. ‘पण आत्ता कुठे जगातील परिस्थिती बदलू लागली आहे. पाश्‍चिमात्य देशांकडे असलेली सत्तेचे संतुलन आता इस्लामी देशांच्या बाजूने झुकू लागले आहे’, असा दावा इराणच्या सर्वोच्च नेत्याने केला. यासाठी खामेनी यांनी अमेरिका व युरोपचा दाखला दिला. अमेरिका व युरोपिय देशांना लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असून गेले वर्षभर हे देश कोरोनाविरोधातील लढ्यात अपयशी ठरले आहेत. युरोपिय देशांमध्ये तर राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, मुस्लिम देशांनी पॅलेस्टाईनसाठी एकजूट दाखविली तर इस्रायल तसेच अमेरिका आणि युरोपमधील त्यांची वकिली करणार्‍यांची झोप उडवेल’, असा दावा खामेनी यांनी केला.

दरम्यान, व्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरारावर वाटाघाटी सुरू आहेत. अशावेळी इस्रायल आणि इराणमध्ये अघोषित संघर्ष सुरू झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करू लागली आहेत. सिरियामधील इराणच्या तळांवर व इराणसमर्थक संघटनांवरील इस्रायलचे हवाई हल्ले व इस्रायलच्या जहाजांवरील इराणकडून होणारे हल्ले हा त्याचाच भाग मानला जातो. इराणच्या अणुकरारावर सुरू असलेल्या वाटाघाटी यशस्वी ठरू नये, यासाठी इस्रायल कारस्थाने आखत असल्याचा आरोप इराणकडून केला जातो. मात्र ही चर्चा सुरू असताना, इस्रायल नष्ट करण्याच्या धमक्या इराणकडून दिल्या जात आहे. यामुळे आपल्या देशाला इराणपासून फार मोठा धोका संभवतो, या इस्रायलच्या दाव्यांना दुजोरा मिळत आहे. याचे दडपण इराणबरोबर नव्याने अणुकरार लागू करण्यासाठी उत्सुक असलेल्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनावर येत आहे.

leave a reply