अणुबॉम्बसज्ज इराणला रोखण्यासाठी इस्रायल कोणतेही पाऊल उचलेल

- सायप्रस, ग्रीस, युएईबरोबरच्या बैठकीत इस्रायलची घोषणा

पॅफोस – इराणमधील कट्टरपंथियांना अणुबॉम्ब मिळू नये, यासाठी इस्रायल आवश्यक असलेल्या कुठल्याही गोष्टी करायला तयार आहे, असे इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांनी जाहीर केले. सायप्रसच्या दौर्‍यावर असताना, इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हा इशारा दिला. त्याचवेळी सायप्रस, ग्रीस, युएई आणि इस्रायल यांच्यातील क्षेत्रीय सहकार्याचे महत्त्व गाबी यांनी अधोरेखित केले. इराण व तुर्कीसारख्या देशांकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, हे धोरणात्मक सहकार्य निर्णायक ठरेल, असे संकेत इस्रायलकडून दिले जात आहेत.

सायप्रस, ग्रीस, युएई आणि इस्रायल या चार देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी बैठकीत, इराण व इराणसंलग्न हिजबुल्लाहपासून आखाताच्या स्थैर्याला असलेल्या धोक्याबाबत यावेळी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री अश्केनाझी यांनी इस्रायलमध्ये दाखल झाल्यावर दिली. सिरिया, लेबेनॉन, इराक आणि येमेनमधील इराणशी संलग्न दहशतवादी संघटना या देशांमध्ये अस्थैर्य माजवित आहेत व यावर चारही देशांचे एकमत झाल्याचे अश्केनाझी म्हणाले.

इस्रायल, युएई, सायप्रस व ग्रीस यांच्यातील हे सहकार्य अतिशय महत्त्वाचे असल्याचेही इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अधोरेखित केले. ‘या चार देशांमधील सहकार्य अब्राहम करारांचा सकारात्मक प्रभाव वाढविण्याच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल ठरते’, असे अश्केनाझी यांनी सांगितले.

तर ‘अब्राहम करारामुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात समृद्धी आणि स्थिरता निर्माण होईल. त्याचप्रमाणे या बैठकीच्या माध्यमातून पूर्व भूममध्य क्षेत्रातील समृद्धी आणि स्थिरतेचा प्रभाव विस्तृत करीत आहोत. चार देशांमधील हे सहकार्य या क्षेत्रीय सहकार्याचा नवा मार्ग ठरत आहे’, अशी घोषणा इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौर्‍यानंतर इस्रायल आणि ग्रीसमध्ये १.६ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार पार पडला आहे. या करारानुसार, इस्रायल ग्रीसला लढाऊ विमानांसंबंधी विशेष सहकार्य देणार आहे.

दरम्यान, भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या प्रक्षोभक कारवाया आणि आखाती क्षेत्रातील इराणचा वाढता हस्तक्षेप, या पार्श्‍वभूमीवर इस्रायल, युएई, ग्रीस व सायप्रसमधील हे सहकार्य इराण-तुर्कीसाठी आव्हान ठरत आहे.

leave a reply