इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्यासाठी इस्रायल सज्ज आहे

- इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी

अणुप्रकल्पांवर हल्लेतेल अविव – ‘आखातातील कुठल्याही देशात दर आठवड्याला एकदा तरी इराणच्याविरोधात मोहीम पार पाडण्यात इस्रायल यशस्वी होतो. इराणमधील लष्करी कारवाईसाठी देखील इस्रायलने चांगलीच तयारी केली आहे. इस्रायली लष्कराला जेव्हा आदेश मिळतील, त्या दिवशी इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले जातील आणि लष्करी मोहीम यशस्वीरित्या पार पाडली जाईल’, असा गंभीर इशारा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांनी दिला. इस्रायलमध्ये बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्या आधी इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी हा इशारा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील, विशेषत: रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद आखातात उमटू लागले आहेत. रशियाचे समर्थन करणाऱ्या इराणविरोधात अमेरिका, युरोपिय देश व इस्रायलमधून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांनी ‘इन्स्टिट्युट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडिज्‌‍’ या अभ्यासगटाला संबोधित करताना इराणचे अणुप्रकल्प इस्रायलच्या निशाण्यावर असल्याचे ठासून सांगितले.

अणुप्रकल्पांवर हल्लेइराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर लष्करी कारवाई करण्यासाठी इस्रायल सज्ज असल्याचे कोशावी म्हणाले. काही आठवड्यांपूर्वी इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले होते. तर त्याआधी इस्रायलच्या लष्कराने इराणच्या आण्विक व लष्करी ठिकाणांवर हल्ल्याची तयारी करावी, अशी सूचना कोशावी यांनी केली होती. त्यानंतर इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख इराणला इशारा देत आहेत.

त्याचबरोबर आखाती देशांमध्ये इराणच्या हितसंबंधांविरोधात इस्रायलच्या कारवाया सुरू असल्याची जाणीव कोशावी यांनी करून दिली. आठवड्याकाठी इस्रायल आखाती देशांमध्ये इराणच्या विरोधात किमान एक मोहीम राबवित असल्याचे कोशावी यांनी म्हटले आहे. लेबेनॉनप्रमाणे सिरियामध्ये देखील हिजबुल्लाह आणि इतर इस्रायलविरोधी दहशतवादी संघटना उभारण्याचे इराणचे इरादे उधळून लावल्याचा दावा कोशावी यांनी केला.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी येत्या मंगळवारी सिरियाला भेट देणार आहेत. ‘राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या वाट्याला या सिरिया दौऱ्यातून निराशाच येईल. कारण इराणला सिरियामध्ये शेकडो क्षेपणास्त्रे आणि हजारो दहशतवादी तैनात करायचे होते. पण आज सिरियामध्ये इराणचे काही तळ, जवान व शस्त्रसाठा शिल्लक राहिला आहे, हे रईसी यांना पहावे लागेल. हे काही आकस्मिकरित्या घडलेले नाही, तर गेल्या दहा वर्षांपासून इस्रायलने ‘सिरियात युद्ध सुरू असताना, केलेल्या युद्धामुळे’ शक्य झाले आहे’, याची जाणीव कोशावी यांनी करुन दिली.

इस्रायलविरोधी आंतरराष्ट्रीय साखळी हा 2023 सालातील सर्वात मोठा धोका

2023 सालासाठी इराण हा इस्रायलचा सर्वात मोठा शस्त्रू ठरत नाही, असा दावा इस्रायली लष्कराच्या गुप्तचर विभागाने केला आहे. इराण हे इस्रायलविरोधाचे केंद्र नाही, तर इस्रायलच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय साखळीचा भाग आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हान 2023मधील सर्वात धोकादायक ठरेल. अमेरिका-चीनमधील तणावावर बरेच काही अवलंबून असल्याचे इस्रायली लष्कराच्या गुप्तचर विभागाने म्हटले आहे. तर युक्रेनमधील युद्ध आणि चीनमधील घडामोडींमुळे बाधित झालेले पुरवठा साखळी, हा इस्रायलसमोरील दुसरा मोठा धोका ठरतो. तर 2023 साली गाझापट्टी आणि वेस्ट बँकमधील वाढते अस्थैर्य इस्रायलच्या सुरक्षेसाठी तिसऱ्या क्रमांकाचा धोका असेल, असा इशारा इस्रायली गुप्तचर विभागाने दिला.

 

leave a reply