आण्विक प्रतिबंधतेप्रमाणे इस्रायल सायबर हल्ले रोखण्यासाठीही सज्ज

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

सायबर हल्ले रोखण्यासाठीहीतेल अविव – अणुहल्ला होऊ नये, यासाठी जशी प्रतिबंधात्मक सिद्धता केलेली असती, अगदी त्याच धर्तीवर सायबर हल्ले रोखण्यासाठीही आमची सज्जता आहे. जर कुणी इस्रायलवर सायबर हल्ले चढविले तर आम्हीही त्याला तसेच प्रत्युत्तर देऊ, अशा खणखणीत शब्दात इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी इराणला इशारा दिला. काही तासांपूर्वीच इराणच्या सर्वात महत्त्वाच्या पोलादनिर्मिती करणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ले झाले होते. यात सदर कंपनीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर अवघ्या काही तासात इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिलेला हा इशारा सूचक असल्याचे दावे केले जातात.

इराणच्या ‘खुझेस्तान स्टील कंपनी’ने आपल्या कारखान्यावर सायबर हल्ला झाल्याची माहिती उघड केली. सोमवारी झालेल्या या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यामुळे इराणी पोलादनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात मोठी आग लागली. यामुळे कंपनीच्या अहवाझ येथील कारखान्यातील काम ठप्प पडले आहे. तसेच कंपनीच्या संकेतस्थळावरही सायबर हल्ला झाला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कारखान्यातील काम बंद राहणार आहे.

सायबर हल्ले रोखण्यासाठीहीयाआधी आपल्या देशात होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी इराणने अमेरिका व इस्रायलला जबाबदार धरले होते. हे सायबर हल्ले म्हणजे इराण व इस्रायलमध्ये सुरू असलेल्या छुप्या युद्धाचा भाग असल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला होता. मात्र यावेळी खुझेस्तान स्टील कंपनीवरील या सायबर हल्ल्यासाठी इराणने कुणावरही आरोप केलेले नाहीत. पण ‘गोनेश्के दरांदे’ नावाच्या गटाने इराणी कंपनीवरील या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर इराणच्या कारखान्यात लागलेल्या आगीचे सीसीटीव्ही फुटेजही या गटाने प्रसिद्ध केले.

पुढच्या काही तासात इस्रायलमध्ये आयोजित ‘सायबर विक’ परिषदेत बोलताना इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणचा थेट उल्लेख करून सायबर हल्ल्यांविरोधात बजावले. ‘इराण, राजधानी तेहरानमध्ये हाहा:कार माजवण्याचे इस्रायलचे धोरण नाही. पण इराणने इस्रायलशी वैर पत्करले, तर मात्र त्याची जबर किंमत इराणला चुकती करावीच लागेल’, असा सज्जड इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. इराणच्या सायबर हल्ल्यांना त्याच धर्तीवर उत्तर दिले जाईल, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी बजावले.

दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही वर्षांपासून छुपे सायबर युद्ध सुरू आहे. 2010 साली इराणच्या अणुकार्यक्रमावर स्टक्सनेट या व्हायरसचा हल्ला झाला होता. यामुळे इराणच्या अणुप्रकल्पातील शेकडो सेंट्रिफ्यूजेस निकामी झाले होते. या सायबर हल्ल्यामागे अमेरिका व इस्रायल असल्याचा ठपका इराणने ठेवला होता. तर इराणने आपल्या देशाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले चढविल्याचा आरोप इस्रायलने केला होता.

2020 साली इराणने इस्रायलच्या जलवाहिनीच्या यंत्रणेवर सायबर हल्ला चढविला होता. तर गेल्या वर्षी इस्रायलने सुमारे 1,500 सायबर हल्ले उधळून लावल्याचा दावा केला आहे.

leave a reply