नवी दिल्ली – इस्रायलने भारताला ‘स्कॉर्पियस-जी’ ही नव्या पिढीतील अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याची तयारी दाखविली आहे. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजची (आयएआय) उपकंपनी असलेल्या ‘ईएलटीए’ने भारतीय नौदल आणि वायुसेनेच्या अधिकार्यांकडे ही यंत्रणा कशी काम करते, याचे सादरीकरणही केल्याचे वृत्त आहे. एकाचवेळी निरनिराळ्या बाजूने येणार्या हवाई धोक्यांपासून सावध करणारी आणि या धोक्यांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टिममध्ये व्यत्यय आणून त्यांना लक्ष्यापासून भरकटविणारी ‘स्कॉर्पियस-जी’ ही जगातील पहिली यंत्रणा असल्याचा इस्रायलचा दावा आहे. ही यंत्रणा मिळाल्यास चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर भारताची हवाई सुरक्षा अधिकच मजबूत होईल व इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची क्षमता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो. त्यामुळे हे वृत्त अतिशय महत्त्वाचे ठरत आहे.
इस्रायलने भारताला आधुनिक ‘ऍक्टिव्ह इलेक्ट्रिकली स्कॅन आरे (एईएसए) आरएफ इलेक्ट्रॉनिक काऊंटरमेजर्स (ईसीएम) जॅमिंग सिस्टिम’ देऊ केली आहे. इस्रायलची ही यंत्रणा ‘स्कॉर्पियस-जी’ या नावाने ओळखली जाते. ऑगस्ट महिन्यात तत्कालीन वायुसेनाप्रमुख एअर मार्शल आर.के.एस. भदौरिया इस्रायल दौर्यावर गेले होते. त्यापाठोपाठ परराष्ट्रमंत्री एस. जयंशकर यांचा इस्रायल दौरा पार पडला होता. तर सध्या लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे इस्रायलच्या दौर्यावर आहेत. तसेच इस्रायलचे नवनियुक्त पंतप्रधान नफ्ताली बेनेट लवकरच भारत दौर्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि इस्रायलमध्ये ‘स्कॉर्पियस-जी’बाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आले आहे.
भारत-इस्रायलमध्ये संरक्षण क्षेत्रात विविध पातळ्यांवर गेली काही वर्ष सहकार्य सुरू आहे. हे सहकार्य अधिकाधिक मजबूत होत आहे. भारत आणि इस्रायलबरोबर काही संयुक्त संरक्षण प्रकल्पांवरही काम करीत आहे. तसेच अत्याधुनिक व संवेदनशील तंत्रज्ञानाचीही खरेदी भारत इस्रायलकडून करीत आहे. याच मालिकेत आता ‘स्कॉर्पियस-जी’सारखी अतीप्रगत हवाई सुरक्षा यंत्रणाही भारताला पुरविण्याची तयारी इस्रायलने केली आहे.
‘स्कॉर्पियस-जी’ ही इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणा आहे. ‘स्कॉर्पियस’ यंत्रणेच्या तीन आवृत्त्या इस्रायलने विकसित केल्या आहेत. यातील एक जमिनीवर वापरण्यासाठी असून हिला ‘स्कॉर्पियस-जी’ असे नाव आहे. तसेच वायुसेनेबरोबर नौदलासाठीही ‘स्कॉर्पियस’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. वायुसेनेसाठीच्या यंत्रणेला ‘स्कॉर्पियस-एसपी’ आणि नौदलासाठी विकसित यंत्रणेला ‘स्कॉर्पियस-एन’ हे नाव देण्यात आले आहे. ही यंत्रणा विमानावर बसविण्यात आल्यास हवेतील, तसेच जमिनीवरील इलेक्ट्रोमॅग्नेटिक यंत्रणामध्ये व्यत्यय आणू शकते. त्यामुळे शत्रूच्या रडार यंत्रणानांही गुंगारा देता येऊ शकतो.
‘स्कॉर्पियस’ यंत्रणा दोन स्तरावर काम करते. ऍक्टिव्ह इलेक्ट्रिकली स्कॅन आरे (एईएसए) इलेक्ट्रोमॅग्नेटिक यंत्रणांकडून येणारे सिग्नल ओळखून त्यामध्ये व्यत्यय आणण्याचे, तर आरएफ इलेक्ट्रॉनिक काऊंटरमेजर्स (ईसीएम) हे शूत्रच्या यंत्रणा ठप्प करण्याचे काम करतात. शत्रूच्या रडार, इलेक्ट्रॉनिक सेंसर्स, दळणवळण व दूरसंचार यंत्रणांना याद्वारे लक्ष्य करता येऊ शकते. एकाचवेळी निरनिराळ्या स्पेक्ट्रममधून निरनिराळ्या दिशेने येणारे सिग्नल ‘स्कॉर्पियस-जी’ यंत्रणा पकडू शकते. लढाऊ विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्र, दूरसंचार यंत्रणा, रडार, जहाजांवरील सिग्नल पकडून वेळीच धोक्याची सूचना देणार्या ही यंत्रणा भारताला देण्यास इस्रायल दाखवत असलेल्या उत्सुकतेचे वृत्त यासाठीच महत्त्वाचे ठरते.