इस्रायल, सौदी, युएई व बाहरिन संयुक्त लष्करी आघाडी उघडण्याच्या तयारीत

- इस्रायली वृत्तवाहिनीचा दावा

जेरूसलेम – इराणपासून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, इस्रायल, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई) व बाहरिन एकत्र येत आहेत. इराणच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायल आणि सौदी व अरब मित्रदेशांमध्ये संयुक्त लष्करी आघाडी उघडण्यासाठी चर्चा सुरू आहे. इस्रायलच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसिद्ध केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणबरोबरील अणुकरारात पुन्हा सामील होण्याच्या तयारीत आहेत. मात्र इराणबरोबर होणार्‍या अणुकराराच्या चर्चेत या क्षेत्रातील देशांना स्थान असेल का, हे बायडेन प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. इस्रायल, सौदी तसेच अरब देशांच्या ‘गल्फ कोऑपरेश काऊन्सिल’ने आवाहन करूनही अमेरिकेने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. या पार्श्‍वभूमीवर, इराणच्या धोक्याला उत्तर देण्यासाठी इस्रायल, सौदी अरेबिया, युएई आणि बाहरिन यांनी एकत्र येण्याचे ठरविले आहे, असा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला.

सहा महिन्यांपूर्वी इस्रायलने युएई आणि बाहरिनबरोबर ‘अब्राहम करारा’अंतर्गत ऐतिहासिक सहकार्य प्रस्थापित केले आहे. पण इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये अधिकृतस्तरावर राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. याआधी या दोन्ही देशांचे नेते आणि अधिकार्‍यांमध्ये छुप्या बैठका झाल्याच्या बातम्या पाश्‍चिमात्य माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या.

गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात गोपनीय बैठक घडविल्याचा दावा अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला होता. पाश्‍चिमात्य माध्यमांनी केलेल्या या दाव्यांना सौदीने दुजोरा दिलेला नाही. पण इस्रायलच्या नेत्यांनी आपला देश सौदीबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे वेळोवेळी जाहीर केले होते.

काही तासांपूर्वीच इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी इराणला रोखण्यासाठी या क्षेत्रातील अरब देशांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. अशा परिस्थितीत, इस्रायली वृत्तवाहिनीने इस्रायल, सौदी, युएई व बाहरिन यांच्यातील बैठकीबाबत प्रसिद्ध केलेल्या बातमीकडे गांभीर्याने पाहिले जाते.

चार दिवसांपूर्वी इस्रायलच्या आणखी एका वृत्तवाहिनीने फक्त इस्रायल आणि सौदीच्या अधिकार्‍यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचे म्हटले होते. बायडेन प्रशासनाने इराणबाबत स्वीकारलेल्या भूमिकेमुळे नाराज झालेले इस्रायल व अरब देश आपली स्वतंत्र आघाडी उघडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply