तेहरान/दुबई – ‘काही दिवसांचा अवकाश आहे. वादळ पुढे सरकत आहे. तुमची वेळ जवळ येत आहे. इराणच्या सूडासाठी तयार रहा, बॉम्ब शेल्टर्स तयार ठेवा’, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इस्रायलला दिली. गेल्या महिन्यात इस्फाहन येथील क्षेपणास्त्रांच्या निर्मिती कारखान्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात रिव्होल्युशनरी गार्ड्सनकडून इस्रायलला ही धमकी दिली जात आहे. इस्फाहन येथील हल्ल्यांमागे इस्रायलचे मर्सिनरीज् अर्थात कंत्राटी जवान असल्याचा ठपका देखील इराणच्या गुप्तचर यंत्रणेने ठेवला आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित ‘इराण मिलिटरी अचिव्हमेंट्स’च्या सोशल मीडियावरील चॅनलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. 27 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून इस्रायलवर भीषण ड्रोन्स हल्ल्यांची धमकी देण्यात आलेली आहे. यामध्ये इराणचे ड्रोन इस्रायलच्या तेल अविव शहरावरुन भरारी घेत असल्याचे दाखविले आहे. हिब्रू आणि अरबी भाषेत रिव्होल्युशनरी गार्ड्सचा इशारा प्रसिद्ध केला आहे.
इस्रायलवर इतक्या तीव्रतेचे ड्रोन्सचे हल्ले चढविले जातील की त्यातून वाचण्यासाठी इस्रायलला बॉम्ब शेल्टर्सचा वापर करावा लागेल, असे या धमकीत रिव्होल्युशनरी गार्ड्सने बजावले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओच्या अधिकृततेबाबत इराण किंवा रिव्होल्युशनरी गार्ड्सनी खुलासा केलेला नाही. पण काही तासांपूर्वीच इराणच्या गुप्तचर यंत्रणेने इस्फाहन येथील ड्रोन हल्ल्यांवरुन इस्रायलवर आरोप केले.
गेल्या महिन्यात इराणच्या इस्फाहन येथील क्षेपणास्त्रांच्या निर्मिती कारखान्यावर झालेल्या हल्ल्यांसाठी इस्रायलचे कंत्राटी जवान जबाबदार आहेत. या हल्ल्याच्या मुख्य आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणाऱ्या इस्रायलला योग्य तो धडा शिकविला जाईल, असा इशारा इराणच्या गुप्तचर यंत्रणेने दिला. लवकरच याबाबतची अधिक माहिती पुराव्यासह प्रसिद्ध केली जाईल, असे इराणच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे.
28 जानेवारी रोजी मध्य इराणच्या इस्फाहन येथील रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या क्षेपणास्त्रांच्या निर्मिती कारखान्यावर तीन ड्रोन्सचे हल्ले झाले. यापैकी एक ड्रोन विमानभेदी यंत्रणेने भेदण्यात यश मिळाल्याचा दावा इराणने केला होता. तर इतर दोन ड्रोन्सच्या हल्ल्यांमध्ये सदर कारखान्याचे मोठे नुकसान झाले नव्हते. सदर हल्ला अयशस्वी ठरल्याचा दावा इराणने केला होता. पण या फसलेल्या हल्ल्यामागे इस्रायल आणि कुर्द बंडखोर असल्याचा आरोप इराणने केला होता.
इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील कुर्द बंडखोर इराणमधील कुर्दांचे या हल्ल्यांसाठी सहाय्य घेत असल्याचा दावा इराणने केला होता. याआधीही आपल्या देशात झालेल्या संशयास्पद हल्ल्यांसाठी इराणने इस्रायल तसेच इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’वर आरोप केले होते. तसेच या हल्ल्यांचा इस्रायलवर सूड उगवण्याची धमकी इराणने दिली होती. यानंतर पर्शियन आखात ते रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या इस्रायलच्या मालवाहू जहाजांवर ड्रोन हल्ले झाले होते. यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये छुपे युद्ध भडकल्याची चिंता अमेरिकन माध्यमांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून इराणमध्ये राजवटीच्या विरोधात निदर्शने भडकली आहेत. स्थानिक कुर्दांच्या पुढाकाराने घेतलेल्या या निदर्शनांना इराणमध्ये जोरदार प्रतिसाद मिळत आहेत. यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्सनी संपूर्ण इराणमध्ये कुर्दांच्या विरोधात धडक मोहीम छेडली होती. अशा परिस्थितीत इराणच्या लष्करी तळांवरील हल्ल्यातही कुर्दांचा समावेश असल्याचा आरोप करून इराणची राजवट कुर्दांना लक्ष्य करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप युरोपमध्ये आश्रय घेतलेले कुर्द नेते करीत आहेत.