तुर्की-सिरियातील भूकंपातील बळींची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता

संयुक्त राष्ट्रसंघाची चिंता

अंकारा/दमास्कस – तुर्की-सिरियातील 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भीषण भूकंपामध्ये 26 हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. पण अजूनही ढिगाऱ्याचा डोंगर उपसणे बाकी आहे. त्यामुळे भूकंपातील बळींची ही संख्या दुपटीने वाढेल, अशी भयावह शक्यता संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्कालिन सहाय्यक गटाचे संचालक मार्टिन ग्रिफिथ्स यांनी वर्तविली. दरम्यान, सोमवारी बसलेल्या भूकंपाच्या मोठ्या झटक्यानंतर तुर्कीला 1,800 हून अधिक हादरे बसले आहेत. तर 27 हजारांहून अधिक इमारती, घरे, कारखाने कोसळल्याचा दावा केला जातो.

quake turkeyदशकातील सर्वात मोठ्या भूकंपाचा सामना करणाऱ्या तुर्की व सिरियाच्या सहाय्यासाठी शंभरहून अधिक देशांनी धाव घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये भूकंपग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सहाय्य तसेच अन्नधान्य पुरविले जात आहे. तुर्कीच्या पश्चिमेकडील ग्रीस व पूर्वेकडील अर्मेनियाने गेल्या कित्येक वर्षांचे वैर विसरुन भूकंपग्रस्तांच्या सहाय्यासाठी आपली सीमारेषा खुली केली आहे. तर अमेरिकेने देखील तात्पुरत्या स्वरुपात सिरियावरील निर्बंध मागे घेऊन भूकंपग्रस्तांसाठी सहाय्य घोषित केले आहे.

शनिवारी तुर्कीच्या सरकारी वृत्तसंस्थेने सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार या प्रलयंकारी भूकंपामध्ये बळी गेलेल्यांची संख्या 22 हजाराजवळ पोहोचली आहे. तर सिरियात भूकंपाने पाच हजार जणांचा बळी गेला आहे. पाच दिवसांच्या बचावकार्यानंतर काही ठिकाणी ढिगाऱ्याखालून लहान मुले, महिलांसह जखमींना वाचविण्यात यश मिळत असल्याच्या बातम्या येत आहे. बचावपथक व वैद्यकीय पथकांच्या या मेहनतीचे जगभरातून कौतूक होत आहे. पण हजारो इमारतींचा ढिगाऱ्याचा डोंगर अजूनही तसाच पडून आहे. हा ढिगारा उपसल्यानंतर बळींची संख्या दुप्पट किंवा त्याहून अधिक होईल, अशी चिंता ग्रिफिथ्स यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर बळी गेलेल्यांची व्यवस्थितरित्या नोंद झालेली नाही, असेही ग्रिफिथ्स म्हणाले. तुर्की-सिरियातील बचावकार्य कधी थांबवायचे हे आत्ताच सांगता येणार नाही. कारण पुढील काही महिने तरी बचावकार्य सुरू असेल, असा दावा ग्रिफिथ्स यांनी केला. राष्ट्रसंघ तुर्कीमध्ये तीन महिने तरी बचावकार्य चालविणार आहे. तर सिरियामध्ये सरकार तसेच बंडखोरांच्या ताब्यातील भागात भूकंपाचे हादरे बसल्यामुळे तेथील बचावकार्य किचकट ठरणार असल्याचे ग्रिफिथ्स यांनी सांगितले.

leave a reply