अपप्रचाराच्या दबावाखाली येऊन इस्रायल दहशतवाद्यांवरील कारवाई थांबविणार नाही

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा सुस्पष्ट इशारा

तेल अविव – इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून ते अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांची भेट घेणार आहेत. पॅलेस्टिनी वंशाची अमेरिकी पत्रकार शिरिन अबू अखलेह यांची इस्रायली लष्कर व पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हत्या झाली होती. यानंतर अमेरिका व इस्रायलमध्ये तणाव निर्माणझाला. या पार्श्वभूमीवर, इस्रायली संरक्षणमंत्र्यांची अमेरिका भेट लक्षणीयठरते. मात्र इस्रायलविरोधात कितीही अपप्रचार केला, तरी त्याच्या दडपणाखाली येऊन इस्रायल दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई रोखणार नाही, असे या देशाचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी बजावले आहे.

इस्रायल व पॅलेस्टिनींमधील संघर्षाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलन स्वीकारलेल्या आक्रमक निर्णयांवर पॅलेस्टिनींकडून जहाल प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून याला चिथावणी देणाऱ्या हमासच्या नेत्यांना ठार करण्याचे इशारे इस्रायल देत आहे. यासाठी हवाई हल्ल्यांचा वापर करण्याची तयारीही इस्रायलने केली आहे. त्याचवेळी आपल्या युद्धसज्जतेत वाढ करण्याबरोबरच नागरिकांनाही यासाठी तयार करण्यासाठी इस्रायलच्या यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

तर दुसऱ्या बाजूला पॅलेस्टिनी नेत्यांनी आजवर इस्रायलने केलेल्या हत्याकांडांची आठवण करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याचे परिणाम दिसू लागले असून इस्रायली सुरक्षा यंत्रणांबरोबरील पॅलेस्टिनींच्या चकमकी अधिकाधिक तीव्र बनत चालल्या आहेत. गेल्या आठवड्यातच या चकमकींचा वृत्तांत देण्यासाठी आलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकार शिरिन अबू अखलेह यांचा गोळीबारात बळी गेला होता. त्यांच्या हत्येसाठी इस्रायली लष्कर व पॅलेस्टिनी हल्लेखोर एकमेकांवर दोषारोप करीत आहेत.

पॅलेस्टिनी वंशाच्या शिरिन अमेरिकेच्या पत्रकार असून या संघर्षात त्यांचा बळी गेला, यासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी इस्रायललाच जबाबदार धरले आहे. इस्रायलच्या कारवाईत त्यांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. यामुळे इस्रायलचे अमेरिकेबरोबरील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ अमेरिकेच्या भेटीवर जाणार असून ते अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी चर्चा करणार आहेत.

या चर्चेच्या आधी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी आपल्या देशाच्या धोरणावर इस्रायलविरोधातील अपप्रचाराचा परिणाम होणार नाही, असे ठणकावले. रविवारी पार पडलेल्या इस्रायली मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत पंतप्रधान बेनेट यांनी ही बाब ठासून सांगितली. इस्रायली संरक्षणदलांची दहशतवाद्यांवरील कारवाई यापुढेही सुरू राहिल, त्यात अजिबात खंड पडणार नाही.

इस्रायलविरोधातील अपप्रचाराच्या दबावाखाली येऊन दहशतवाद्यांना मोकळे रान देता येणार नाही, असे पंतप्रधान बेनेट यांनी बजावले आहे. आपल्या या विधानातून इस्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात इशारा दिल्याचे दिसते आहे.

leave a reply