इस्रायल युक्रेनला इराणविरोधात सहाय्य करणार

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री युक्रेनच्या दौऱ्यावर

किव्ह – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी संघर्षात गुंतलेल्या युक्रेनचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. इराण हा इस्रायल तसेच युक्रेनचा समान शत्रू असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. तर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी देखील युक्रेनला इराणविरोधात सहाय्य करणार असल्याचे जाहीर केले. मात्र परराष्ट्रमंत्री कोहेन यांनी आपल्या या दौऱ्यात उघडपणे रशियावर टीका करण्याचे टाळले.

zelensky cohenरशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला लवकरच वर्ष पूर्ण होत आहे. या रशियाविरोधी संघर्षात अमेरिकेच्या इतर मित्रदेशांप्रमाणे इस्रायलने देखील आपल्याला सहाय्य करावे, अशी मागणी युक्रेनने केली होती. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनानेही यासाठी इस्रायलवर दबाव टाकला होता. पण इस्रायलने युक्रेनला मानवतावादी सहाय्य पुरविण्यापलिकडे लष्करी सहाय्य पुरविण्यास नकार दिला होता. या युद्धात युक्रेनला सहाय्य केले तर इस्रायलला सिरियातील इराणविरोधी कारवाईसाठी रशियाचे मिळणारे सहाय्य गमावावे लागेल, याची जाणीव इस्रायलने युक्रेन तसेच अमेरिकेला करुन दिली होती.

महिन्याभरापूर्वी इस्रायलमध्ये बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा युक्रेनने इस्रायलकडे लष्करी सहाय्य पुरविण्याची मागणी केली. इस्रायलनेही युक्रेनला सकारात्मक प्रतिसाद दिल्याच्या बातम्या येत होत्या. अशा परिस्थितीत, गुरुवारी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी युक्रेनचा केलेला दौरा महत्त्वाचा ठरतो. सदर युद्ध भडकल्यापासून युक्रेनला भेट देणारे कोहेन हे इस्रायलचे पहिले वरिष्ठ अधिकारी ठरत आहेत. यावेळी कोहेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की तसेच परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांची भेट घेतली. इराण हा इस्रायल तसेच युक्रेनचा समान शत्रू असल्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले. तसेच इराणच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन झेलेन्स्की यांनी केले. झेलेन्स्की यांच्याबरोबरच्या भेटीत इराणविरोधी सहकार्यावर चर्चा झाल्याची माहिती कोहेन यांनी दिली. तर इस्रायलने देखील युक्रेनला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार असल्याचे जाहीर केले. येत्या तीन ते सहा महिन्यात सदर यंत्रणा युक्रेनच्या हवाली केली जाईल, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. पण इस्रायल युक्रेनला कोणती यंत्रणा पुरविणार, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दरम्यान, इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांच्या या युक्रेन दौऱ्यावर रशियाच्या वृत्तवाहिनीने टीका केली. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ज्यूधर्मियांच्या द्वेषाने भरलेल्या युक्रेनला भेट दिल्याचा शेरा या वृत्तवाहिनीने मारला.

leave a reply