भारतविरोधी शक्तींचे केंद्र असलेल्या जॉर्ज सोरस यांचा भारतीयांनी एकमुखाने निषेध करावा

- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

नवी दिल्ली – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक आपल्या देशात भारतामुळे लाखोजणांना रोजगार मिळणार असल्याचे सांगून भारताचे आभार मानत आहेत. जगात प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून भारताचा उदय होत आहे. अशा परिस्थितीत काही विदेशी शक्तींनी भारतविरोधी कारवाया सुरू केल्या असून जॉर्ज सोरस या विदेशी शक्तींचे केंद्र आहेत. त्यांनी भारताच्या पंतप्रधानांबरोबरच भारताच्या लोकशाही व्यवस्थेवरच हल्ला चढविला आहे. याला देशातील प्रत्येक नागरिक, संघटना व राजकीय पक्षांनी देखील एकमुखाने विरोध करायला हवा’, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले.

धनाढ्य गुंतवणूकदार म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले जॉर्ज सोरस यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करणारी चिथावणीखोर विधाने केली आहेत. त्याचा समाचार घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोरस यांचा भारतीयांनी एकमुखाने विरोध करण्याचे हे आवाहन केले. भारत हा लोकशाहीवादी देश आहे, पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीवादी नाहीत, असा अजब दावा सोरस यांनी केला. भारतात लोकशाही व्यवस्थेची घसरण झाली असून एकाच वेळी भारत उदारमतवादी व बंदिस्त व्यवस्था असलेल्या देशांशी चांगले संबंध राखून आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या क्वाडमध्ये भारताचा सहभाग आहे. त्याचवेळी भारत रशियाकडून स्वस्त दरात इंधनाची खरेदी करून नफा कमवत आहे, अशी टीका जॉर्ज सोरस यांनी केली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याशी मोदी यांचे उत्तम संबंध असल्याचा दावा देखील जॉर्ज सोरस यांनी केला. इतकेच नाही तर भारतीय लोकशाहीमध्ये आपल्याला सुधारणा अपेक्षित असल्याचे सांगून या धनाढ्य गुंतवणूकादराने भारताच्या लोकशाही प्रक्रियेत दोष असल्याचे दावे केले आहेत. त्यांच्या या विधानांवर भारतीय माध्यमांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील यावर बोट ठेवून सोरस यांच्या दाव्यांच्या चिंधड्या उडविल्या. लोकतांत्रिक पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करून जॉर्ज सोरस यांनी भारताच्या लोकशाहीवरच आघात केला आहे. भारतात आपल्याला अपेक्षित असलेली व्यवस्था लागू करण्यासाठी जॉर्ज सोरस हालचाली करीत आहेत. इतकेच नाही तर भारतात अशी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सोरस यांनी युद्धच पुकारलेले आहे, असा घणाघाती आरोप स्मृती इराणी यांनी केला.

मात्र भारत अशा परकीय शक्तींना कायम पराभूत करीत आला आहे. यावेळीही त्यांचा पराभवच होईल, असा विश्वास स्मृती इराणी यांनी व्यक्त केला. भारतीय वृत्तवाहिन्यांनी देखील सोरस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली असून देशभरात सोरस यांच्या चिथावणीखोर विधानांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. एक नाही तर अनेक गंभीर आरोप असलेल्या या धनाढ्याला भारताच्या व्यवस्थेवर प्रश्न करण्याचा अधिकारच काय? असा सवाल विचारण्यात येत आहे. इतकेच नाही तर सोरस यांच्याशी निगडीत असलेल्या काळ्याकुट्ट इतिहासाचीही उजळणी या निमित्ताने केली जात आहे.

leave a reply