इस्रायल व युएईमध्ये मुक्त व्यापारी करार

- वर्षअखेरीपर्यंत व्यापार दोन अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोणार

मुक्त व्यापारी करारजेरूसलेम/दुबई – 2020 सालच्या सप्टेंबर महिन्यात अब्राहम करार करून युएईने इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित केले. मंगळवारी मुक्त व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या करून इस्रायल आणि युएईने हे सहकार्य नव्या उंचीवर नेले आहे. आखाती देशाबरोबर इस्रायलने केलेला हा पहिला मुक्त व्यापारी करार ठरतो. त्यामुळे हा करार ऐतिहासिक ठरला असून यामुळे आखाती क्षेत्रातील राजकारण व अर्थकारणाचे वारे निराळ्या दिशेने वाहू लागल्याचे दिसत आहे. युएईचे अनुकरण करून आखातातील इतर काही देश इस्रायलशी मुक्त व्यापारी करार करण्यासाठी पुढाकारघेण्याची शक्यता यामुळे समोर येत आहे.

याआधी इस्रायल आणि युएई यांच्यात कुठल्याही प्रकारचे सहकार्य नव्हते. पॅलेस्टाईनच्या मुद्यावरुन इतर अरब देशांप्रमाणे युएईने देखील इस्रायलविरोधात भूमिका स्वीकारली होती. पण 2020 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युएईने इस्रायलबरोबर अब्राहम करार केला. यानंतर इस्रायल व युएई यांच्यात वेगवेगळ्या स्तरावर सहकार्य प्रस्थापित झाले. यामध्ये व्यापारी तसेच लष्करी सहकार्याचा देखील समावेश आहे.

काही महिन्यांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी युएईला भेट देऊन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेतली होती. त्यानंतर इस्रायल व युएईमध्ये मुक्त व्यापारी कराराबाबत हालचाली सुरू झाल्याचा दावा केला जातो. गेले कित्येक आठवडे दोन्ही देशांमध्ये यावर वाटाघाटी सुरू होत्या. मंगळवारी इस्रायलच्या अर्थ आणि उद्योगमंत्री ओरना बार्बिवाई तर युएईचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल-मारी यांनी अंतिम करारावर स्वाक्षरी केली.

मुक्त व्यापारी करारइस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी या मुक्त व्यापारी कराराचे स्वागत केले. तसेच इस्रायल आणि अरब देशामधील हा पहिला ऐतिहासिक मुक्त व्यापारी करार असल्याची घोषणा पंतप्रधान बेनेट यांनी केली. कुठल्याही देशाबरोबर इस्रायलने इतक्या वेगाने मुक्त व्यापारी करार केलेला नाही, असे सांगून इस्रायलच्या पंतप्रधानांनी या कराराचे महत्त्व अधोरेखित केले.

इस्रायल आणि युएईतील व्यापार येत्या वर्षअखेरीपर्यंत दोन अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार असल्याचे ‘युएई-इस्रायल बिझनेस काऊन्सिल’चे अध्यक्ष डोरियन बराक यांनी जाहीर केले. तर पुढील पाच वर्षात हेच सहकार्य पाच अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वास बराक यांनी व्यक्त केला. दुबई हे इस्रायली कंपन्यांचे प्रमुख केंद्र बनत असल्याचा दावा बराक यांनी केला. येत्या वर्षअखेरीपर्यंत जवळपास हजार इस्रायली कंपन्या युएईमध्ये काम करतील, असेही पुढे बराक म्हणाले.

दरम्यान, अब्राहम कराराच्याही आधी इस्रायलने इजिप्त, जॉर्डन या शेजारी अरब देशांबरोबर व्यापारी सहकार्य प्रस्थापित केले आहे. पण या दोन्ही देशांबरोबर इस्रायलने मुक्त व्यापारी करार केलेला नाही, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत. त्यामुळे इस्रायल आणि युएईतील हा करार आखातातील घडामोडींसाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे या इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply