जेरूसलेम – ‘वर्षाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत इस्रायलच्या सुरक्षादलांनी ११० हून अधिक दहशतवादी हल्ले उधळले व त्यांना ताब्यात घेतले. तर सुरक्षादलांच्या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये ९० टक्के दहशतवादी होते. इस्रायलची जनता व सुरक्षेला आव्हान देणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरू राहिल. दहशतवादी, खूनी, तुम्ही कुठेही लपून बसा पण इस्रायलचे सुरक्षादल तुम्हाला कुठूनही शोधून काढतील’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या सिरिया दौऱ्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना हा इशारा दिल्याचे दिसत आहे.
महिन्याभरापूर्वी वेस्ट बँकच्या रस्त्यावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन ब्रिटीश महिलांचा बळी गेला होता. यामध्ये दोन तरुणी व त्यांच्या आईचा समावेश होता. जगभरातून या हत्याकांडावर टीका होत असताना, वेस्ट बँक तसेच गाझापट्टीमधील कट्टरपंथियांनी आनंद साजरा केला होता. इस्रायलच्या सुरक्षादलांनी या हत्याकांडात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला होता. तीन दिवसांपूर्वी वेस्ट बॅकमधील नेब्लस शहरात पहाटे इस्रायलच्या सुरक्षादलांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणाला घेराव टाकून केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले.
या कारवाईनंतर वेस्ट बँकमधून इस्रायलच्या सुरक्षादलांवर दगडफेक झाली, तर काही ठिकाणी गोळीबारही झाला. पहिल्यांदाच सिरियाच्या दौऱ्यावर असलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी देखील वेस्ट बँकमधील या कारवाईवर टीका केली. तसेच सिरियामध्ये हमास, इस्लामिक जिहाद तसेच हिजबुल्लाहच्या नेत्यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतंत्र बैठक घेतली होती. इस्रायल पॅलेस्टाईनच्या विरोधातील युद्धात पराभूत होत असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला होता. तसेच इस्रायलविरोधी लढ्यासाठी इराणकडून हे सहाय्य मिळणार असल्याचे रईसी यांनी घोषित केले होते.
अशा परिस्थितीत, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी रविवारच्या कॅबिनेटमधील बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संरक्षणदलांनी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना उद्देशून इशारा दिला. इस्रायली सुरक्षादलांच्या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये ९० टक्के दहशतवादी होते. इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही नेत्यान्याहू यांनी बजावले. इस्रायलच्या सुरक्षादलांचे लांब हात जगात कुठेही दडलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करील, असे सांगून नेत्यान्याहू यांनी वेस्ट बँक, गाझापट्टीसह इराण, सिरिया, लेबेनॉनमधील दहशतवाद्यांनाही इशारा दिला.
दरम्यान, इराणचे नेते व लष्करी अधिकारी इस्रायलवर हल्ल्याच्या धमक्या देत आहेत. इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याच्या घोषणा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या पंतप्रधानांनीही इराणला हा इशारा दिल्याचे दिसत आहे.
हिंदी