इस्रायल युक्रेनला संरक्षणसाहित्य पुरविणार

- रशियाकडून इस्रायलला प्रत्युत्तराचा इशारा

जेरूसलेम – गेल्या दोन महिन्यांपासून रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात इस्रायलने तटस्थ भूमिका स्वीकारली होती. पण लवकरच युक्रेनला संरक्षणसाहित्य पुरविणार असल्याची घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केली. याआधीच युक्रेनी लष्कराकडे इस्रायली बनावटीचा शस्त्रसाठा सापडल्याची माहिती समोर आली होती. अशा परिस्थितीत इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर रशियाने चिंता व्यक्त केली. इस्रायलने युक्रेनच्या लष्कराला शस्त्रसज्ज केले, तर त्याला योग्य प्रत्युत्तर मिळेल, असे रशियाने बजावले आहे.

संरक्षणसाहित्यदोन दिवसांपूर्वी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ आणि युक्रेनचे संरक्षणमंत्री ॲलेक्सी रेझ्नीकोव्ह यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यात युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी इस्रायलकडे लष्करी सहाय्याची मागणी केली. यानंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनला संरक्षणसाहित्याचा साहित्यांचा पुरवठा करण्याचे जाहीर केले. यामध्ये बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि हेल्मेट्चा समावेश आहे. हे संरक्षणसाहित्य युक्रेनच्या लष्करासाठी नसून नागरी वापरासाठी पुरविण्यात येणार असल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

मात्र इस्रायलचा हा खुलासा रशियाला पटलेला नाही. इस्रायलने या युद्धाबाबत स्वीकारलेल्या तटस्थ भूमिकेतून माघार घेतल्याची टीका रशियात जोर पकडत आहे. इस्रायलमधील रशियन राजदूत ॲनातोली विक्टोरोव्ह यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना इस्रायली संरक्षणमंत्र्यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली. ‘इस्रायलने युक्रेनसाठी केलेल्या घोषणेकडे रशिया सावधपणे पाहत आहे. आवश्यकतेनुसार रशिया त्याला प्रत्युत्तर देईल’, असा इशारा रशियन राजदूत विक्टोरोव्ह यांनी दिला.

संरक्षणसाहित्यरशिया व युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यापासून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये इस्रायलने तटस्थ भूमिका स्वीकारली होती. इस्रायलने युक्रेनला शस्त्रपुरवठा करावा, अशी मागणी अमेरिका व युरोपिय देशांनी इस्रायलकडे केली होती. युक्रेनने देखील इस्रायलकडे आयर्न डोम या हवाई सुरक्षा यंत्रणेची मागणी केली होती. पण इस्रायलने युक्रेनला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. इस्रायलची ही भूमिका रशियाला समर्थन देणारी असल्याचा आरोप अमेरिका व युरोपमधील माध्यमांनी केला होता.

पण इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी युक्रेनला लष्करी सहाय्याची घोषणा केल्यानंतर इस्रायलच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा इस्रायली माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. तसेच इस्रायली संरक्षण साहित्य युक्रेनच्या लष्करातील नाझीसमर्थकांपर्यंत पोहोचत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इस्रायल तसेच सिंगापूरआणि जर्मन कंपनीने तयार केलेले ‘मॅटाडोर’ रॉकेट्स युक्रेनच्या लष्करातील अझोव्ह बटालियनमधील जवानांकडे असल्याचे उघड झाले आहे.

अझोव्ह बटालियन युक्रेनच्या लष्करातील नाझी समर्थक तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन करणारा गट म्हणून ओळखला जातो. या गटाचे सदस्य युक्रेनच्या तुरुंगात होते. त्यांच्यावर अत्याचारांसारखे गंभीर आरोप आहेत. पण युद्ध पेटल्यानंतर, युक्रेनने आपल्या कैद्यांना शस्त्रसज्ज करून रशियन सैन्याच्या विरोधात युद्धात उतरविले होते. अशारितीने अझोव्ह बटालियन नामक नाझीवादी गट युक्रेनसाठी लढत असल्याचे समोर येत आहे.

या अझोव्ह बटालियनन इस्रायली बनावटीच्या मॅटाडोर रॉकेटसच्या सहाय्याने रशियन रणगाडे नष्ट केले होते, याची आठवण इस्रायली माध्यमे करून देत आहेत. अशा परिस्थितीत, इस्रायलने युक्रेनला लष्करी साहित्य पुरविले तर त्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. याचा इस्रायल व रशियाच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत.

leave a reply