इस्रायली लष्कराची हमाससह इतर दहशतवादी संघटनांवर कारवाई

israel-forcesजेरूसलेम – रविवारी सकाळी इस्रायलच्या संरक्षणदलांनी गाझापट्टी व वेस्ट बँकमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत हमास आणि संलग्न दहशतवादी संघटनेला लक्ष्य केले. इस्रायलच्या नौदलाने गाझाच्या सागरी क्षेत्रात दाखल झालेल्या हमासच्या बोटीवर कारवाई करुन मोठा शस्त्रसाठा जप्त केला. तर याच सुमारास इस्रायलच्या स्पेशल फोर्सेसने वेस्ट बँकमध्ये केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार केले.

इस्रायलच्या नौदलाने रविवारी पहाटे इजिप्तमधून गाझापट्टीत अवैधरित्या दाखल होणाऱ्या बोटीवर कारवाई केली. शनिवारी रात्री इजिप्तच्या सिनाई प्रांतातून निघालेल्या या बोटीने गाझापट्टीच्या सागरी क्षेत्रात निषिद्ध क्षेत्रातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. इस्रायलच्या नौदलाने इशारे दिल्यानंतरही सदर बोटीने प्रवास सुरू ठेवल्यामुळे इस्रायली जवानांनी गोळीबार केला. यानंतर इस्रायली लष्कराने सदर बोट ताब्यात घेतली. या बोटीतून रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे आणि अन्य शस्त्रसाठा हमासच्या ठिकाणासाठी नेला जात होता, अशी माहिती समोर येत आहे.

terrorist-organizationsया वर्षाच्या सुरुवातीलाही इस्रायलच्या नौदलाने शस्त्रास्त्रांची तस्करी हाणून पाडली होती. याआधी हमासचे दहशतवादी इजिप्तच्या सिनाई प्रांतातून भुयारी मार्गाने शस्त्रास्त्रांची तस्करी करीत होते. पण इस्रायलने इजिप्तच्या लष्कराच्या सहाय्याने हे भुयारी मार्ग नष्ट केल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने तस्करी सुरू केल्याचे दिसत आहे.

रविवारी पहाटे इस्रायलचे नौदल गाझाच्या किनारपट्टीजवळ तस्करी उधळून लावत होते, तर दुसरीकडे इस्रायली लष्कराचे स्पेशल फोर्सेस वेस्ट बँकमधील नेब्लस भागात हमाससंलग्न दहशतवादी संघटनेवर कारवाई करीत होते. इस्रायली सुरक्षा यंत्रणेवर गोळीबाराचे आरोप असलेल्या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी इस्रायली लष्कराने मोहीम आखली होती. पण दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर स्पेशल फोर्सेसला कारवाई करावी लागली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खातमा झाला तर सहाजण जखमी झाल्याचे सांगितले जाते.

israel-hamas-boatदरम्यान, आखाती क्षेत्रात फार मोठी राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. इस्रायलने अरब देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलली आहेत. अब्राहम करारामुळे या सहकार्याला वेग मिळाला असून पुढच्या काळात आखाती देश आपल्या संरक्षणासाठीही इस्रायलशी सहकार्य करण्यासाठी हालचाली करू लागले आहेत.

आखाती देशांनी अशारितीने इस्रायलशी संरक्षणविषयक सहकार्य प्रस्थापित केले, तर त्याचे या क्षेत्रावर भयंकर परिणाम होतील, असा इशारा इराण देत आहे. इस्रायल व अरब-आखाती देश इराणपासून संभवणाऱ्या धोक्यांविरोधात भक्कम आघाडी उभी करीत आहेत. याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने कट्टर इस्रायलविरोधी असलेल्या हमास व इतर दहशतवादी संघटनांना सर्वतोपरी सहाय्य पुरविण्याची तयारी केलेली आहे.

या पार्श्वभूमीवर, हमाससाठी पाठविला जाणारा प्रचंड शस्त्रसाठा इस्रायलने जप्त केला असून याची गंभीर दखल घेणे इस्रायलला भाग पडेल.

leave a reply