जेरूसलेम/किव्ह – इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अचानक रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली. तर गेल्या चोवीस तासात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी तीन वेळा चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये संघर्षबंदीची शक्यता धुसर झाली असली तरी इस्रायल रशिया-युक्रेनमध्ये मध्यस्थी सुरू ठेवणार असल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी केली. त्याचबरोबर युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात इस्रायलमध्ये निर्वासितांची लाट येईल व इस्रायल त्याची तयारी करीत असल्याचे सूचक विधान पंतप्रधान बेनेट यांनी केले आहे.
रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असणार्या इस्रायलने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा करावी, असे आवाहन युक्रेनने याआधी केले होते. संघर्षबंदीसाठी चर्चेचे आवाहन करणार्या युक्रेनने रशियाविरोधी संघर्षासाठी इस्रायलकडे लष्करी सहाय्याची मागणी देखील केली होती. युक्रेनचे लष्करी अधिकारी उघडपणे इस्रायलकडे हवाई सुरक्षा यंत्रणेची मागणी करीत आहेत. यासाठी अमेरिका व जर्मनीने देखील इस्रायलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी युक्रेनला शस्त्रसज्ज करण्याचे नाकारले होते.
मात्र रशिया व युक्रेनमध्ये मध्यस्थी करण्यावर इस्रायलने पावले उचलण्यास सुरुवात केली असून यासाठी पंतप्रधान बेनेट यांनी शनिवारी रशियाचा दौरा केला. या दौर्यात इस्रायलच्या पंतप्रधानांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर तब्बल तीन तास चर्चा केली. सध्या सुरू असलेला संघर्ष तसेच इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याचा दावा केला जातो. रशियन राष्ट्राध्यक्ष आणि इस्रायलच्या पंतप्रधानांमधील चर्चेचे सारे तपशील समोर आलेले नाहीत.
पण रशियामधून निघाल्यानंतर व जर्मनीला पोहोचण्याआधी इस्रायलच्या पंतप्रधानांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान बेनेट यांनी पुन्हा एकदा झेलेन्स्की यांना फोन केला होता. परतीच्या प्रवासात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्याशी बोलणे झाल्यानंतरही इस्रायलच्या पंतप्रधानांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली.
रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्षबंदी घडवून आणण्यासाठी इस्रायलने घेतलेला पुढाकार लक्ष वेधून घेणारा ठरतो. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना इस्रायली पंतप्रधानांची ही रशिया भेट म्हणजे सर्वसाधारण बाब ठरत नाही. त्याचवेळी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी अनेकवार चर्चा करून इस्रायलच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. रशिया भीषण हल्ले चढवित असताना, अमेरिका-नाटो युक्रेनला अपेक्षित सहाय्य करीत नसल्याची टीका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की करीत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनने युद्धबंदीसाठी इस्रायलला घातलेले साकडे निराळेच संकेत देत असल्याचे दिसते.