नवी दिल्ली – आपल्या सुर्यमालेतील सर्वाधिक उष्ण ग्रह असलेल्या शुक्राचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 सालात ही मोहीम राबविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून खूप कमी वेळेत ही मोहीम राबविणे शक्य असल्याचा दावा इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी केला आहे.
इस्रोने शुक्र मोहीमेची योजना आखली आहे व त्याचा अहवाल तयार केला जात आहे. या शुक्र मोहिमेची आखणी कमी वेळात करणे व ती कमी वेळेत राबविणे इस्रोसाठी शक्य आहे. इस्रोकडे तशी क्षमता आहे, असे सोमनाथ म्हणाले. 2024 सालात ही मोहीम राबविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शुक्र हा आपल्या सुर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. या ग्रहाला सल्फुरीक ॲसिडच्या ढगांनी सदैव वेढलेले असते. या अतिउष्ण ग्रहाच्या पृष्ठभागाखाली नक्की काय आहे, याचा अभ्यास या मोहिमेत करण्यात येईल. शुक्र व पृथ्वीचे वजन, आकार आणि गुरुत्वाकर्षण साधारण सारखे आहे. त्यामुळे या ग्रहाचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे चंद्रयान, मंगळयान मोहिमेनंतर शुक्र मोहीमेची संकल्पना मांडण्यात आली आहे.
दरम्यान अमेरिकेच्या नासानेही शुक्र ग्रहावर यान पाठविण्याची तयारी केली आहे. 2030 सालात ही मोहीम आखण्यात येईल. त्याआधी भारत शुक्र मोहीम राबवू शकतो, असे संकेत याद्वारे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिले आहेत.