तालिबानची राजवट अस्थिर करणे कुणाच्याही हिताचे नसेल

- तालिबानचा अमेरिकेला इशारा

दोहा – ‘अफगाणिस्तानातील तालिबानचे सरकार अस्थिर करणे कुणाच्याही हिताचे नसेल. अफगाणिस्तानशी चांगले संबंध ठेवणे प्रत्येकासाठी हिताचे ठरेल. तालिबानचे सरकार कमजोर करण्याचा प्रयत्न केलाच तर सर्वांनाच समस्या निर्माण होतील’, असा इशारा तालिबानचा परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी याने दिला. त्याचबरोबर ड्रोन्सद्वारे अमेरिकेने अफगाणिस्तानच्या हवाईहद्दीचे उल्लंघन करु नये, असेही मुत्ताकी याने बजावले. पहिल्याच दोहा बैठकीतून अमेरिकेला धमकावणार्‍या तालिबानवर तसेच त्यांच्याशी चर्चेसाठी तयार झालेल्या बायडेन प्रशासनावर अमेरिकेत टीका होत आहे.

तालिबानची राजवट अस्थिर करणे कुणाच्याही हिताचे नसेल - तालिबानचा अमेरिकेला इशारातालिबानने काबुलचा ताबा घेऊन लवकरच दोन महिने पूर्ण होतील. या काळात तालिबानने दोहा बैठकीतील कराराचे पालन केले नसल्याची टीका आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. या करारासाठी मध्यस्थी करणार्‍या कतारने देखील गेल्या आठवड्यात तालिबानच्या धोरणांवर ताशेरे ओढले होते. तालिबानने या काळात महिलांचे अधिकार डावलून त्यांना गुलामासारखी वागणूक दिली, आरोपींना भरचौकात फासावर लटकविले आणि हजारा अल्पसंख्यांक समुदायाचे हत्याकांड घडविल्याचे समोर आल्यानंतर अमेरिकेतही संताप व्यक्त करण्यात आला होता.

अशा परिस्थितीत अमेरिकेनेच तालिबानबरोबर दोहा येथे चर्चा सुरू केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसांच्या या बैठकीचे सारे तपशील घड झालेले नाहीत. पण तालिबानचा परराष्ट्रमंत्री मुत्ताकी याने शनिवारच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अमेरिकेला धमकावले. अमेरिका अफगाणिस्तानातील तालिबानचे सरकार अस्थिर करीत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप मुत्ताकी याने केला. याशिवाय अमेरिकेने अफगाणिस्तानचे रोखलेले केलेले फंडींग मोकळे करावे, मानवतावादी सहाय्याचा मार्ग खुला करावा आणि अफगाणिस्तानच्या जनतेसाठी कोरोनाप्रतिबंधक लस पुरवावी, अशा मागण्या मुत्ताकी याने पुढे केल्या. तालिबानची राजवट अस्थिर करणे कुणाच्याही हिताचे नसेल - तालिबानचा अमेरिकेला इशाराअमेरिका व इतर देशांबरोबर तालिबानला सहकार्याचे नवे पर्व सुरू करायला आवडेल, असेही मुत्ताकी म्हणाला. अमेरिकेनंतर तालिबानचे नेते दोहा येथेच युरोपिय महासंघाच्या नेत्यांना भेटणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

पण सर्वसमावेशक सरकार, महिलांचे अधिकार, अल्पसंख्यांकांची सुरक्षा तसेच इतर महत्त्वाच्या मुद्यांवर बोलण्याचे तालिबानच्या नेत्याने टाळले. २० वर्षानंतरही तालिबानच्या मानसिकतेमध्ये किंचितही फरक पडलेला नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तालिबानबरोबर चर्चा सुरू करणार्‍या बायडेन प्रशासनावर अमेरिकेत टीका होत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन तालिबानबाबत नरमाईचे धोरण स्वीकारत असल्याचे ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच तालिबानने अमेरिकेला धमकावल्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावरील टीकेची धार अधिकच वाढली आहे.

leave a reply