नवी दिल्ली – “ऊर्जा सुरक्षा, अन्नसुरक्षा आणि आर्थिक विकास, हा ‘आयटूयुटू’चा विधायक अजेंडा याच्या पहिल्याच बैठकीत समोर आला आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता लक्षात घेता, देशांमधील सक्रीय सहकार्याची चौकट आयटूयुटूने जगासमोर ठेवलेली आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत, इस्रायल, युएई आणि अमेरिका यांच्या आयटूयुटू गटाच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली व्हर्च्युअल बैठक गुरुवारी पार पडली. पंतप्रधान मोदी यांनी या सहकार्याचे स्वागत केले. याच्या पहिल्याच बैठकीत अन्नसुरक्षा व उर्जा क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.
आयटूयुटूच्या अंतर्गत भारत, इस्रायल, युएई आणि अमेरिकेची अत्यंत महत्त्वाच्या अशा सहा क्षेत्रांमध्ये संयुक्त गुंतवणुकीवर सहमती झालेली आहे. यात पाणी, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य आणि अन्नसुरक्षा यांचा समावेश असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. चारही देशांचे क्षमता, भांडवल, कौशल्य, बाजारपेठा यांची सांगड घालून आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाला फार मोठे योगदान देऊ शकतो, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
या बैठकीत आयटूयुटूकडून गुजरातमधील ‘हायब्रिड रिन्यूएबल एनर्जी प्रोजक्ट’मध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. याबरोबरच आयटूयुटूचा भाग असलेल्या युएईने भारतात ‘इंटिग्रेटेड फूड पार्क’ उभारण्यासाठी तब्बल 200 कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आयटूयुटूचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा लाभ मिळेल, हा विश्लेषकांनी केलेला दावा प्रत्यक्षात उरत असल्याचे दिसू लागले आहे.
दरम्यान, आयटूयुटू म्हणजे पश्चिम आशियाई क्वाड असल्याचे दावे केले जातात. या गटामधील भारताचा समावेश गेमचेंजर ठरणार असल्याचे इस्रायलच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी म्हटले होते. गेल्या काही वर्षांपासून आखाती देशांवरील भारताचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे भारत इस्रायलशी सहकार्याचे महत्त्व आखाती देशांना अधिक प्रभावीपणे पटवून देऊ शकतो, असा विश्वास इस्रायलच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व्यक्त केला होता.