अमेरिकेत महागाईचा विक्रमी भडका

-महागाई निर्देशांक 9.1 टक्क्यांवर

वॉशिंग्टन – अमेरिकेतील महागाई निर्देशांक 9.1 टक्क्यांवर पोहोचला असून ही गेल्या चार दशकांमधील विक्रमी महागाई ठरली आहे. 1981 सालानंतर प्रथमच अमेरिकेतील महागाईने नऊ टक्क्यांची पातळी ओलांडली. या महागाईच्या भडक्यामागे इंधन व अन्नधान्याच्या वाढत्या दरांबरोबरच पुरवठा साखळीतील अडचणी हा घटकदेखील कारणीभूत असल्याचा दावा अमेरिकी यंत्रणांनी केला. महागाई निर्देशांकाच्या माहितीनंतर अमेरिकेतील शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली. अमेरिकेबरोबरच ब्रिटनमध्येही महागाई निर्देशांक 9.1 टक्के नोंदविण्यात आला असून हा ‘जी7′ गटातील नवा रेकॉर्ड ठरला आहे.

Inflation-in-USज्यो बायडेन यांनी गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेतील महागाई निर्देशांकात सातत्याने वाढ होत आहे. सुरुवातीच्या काळात बायडेन यांनी याचे खापर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर फोडले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी व वाढत्या मागणीमुळे इहागाई वाढत असल्याचा दावा केला होता. आता राष्ट्राध्यक्ष बायडेन अमेरिकेतील महागाईसाठी रशियाने युक्रेनविरोधात छेडलेल्या महागाईला जबाबदार धरत आहेत. आपल्या वक्तव्यांमध्ये बायडेन सातत्याने ‘पुतिन इन्फ्लेशन’ असा उल्लेख करून सर्व दोष त्यांचा असल्याचे सांगत आहेत.

पण अमेरिकेतील वाढती महागाई ही प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम असल्याचे विरोधी पक्षासह आघाडीचे विश्लेषक तसेच अर्थतज्ज्ञ लक्षात आणून देत आहेत. बायडेन यांनी अमेरिकेतील इंधनक्षेत्रावर टाकलेल्या निर्बंधांमुळे देशातील इंधनाचे उत्पादन घटल्याचे व त्यामुळे इंधनाच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाल्याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले. गेल्या वर्षभरात अमेरिकेतील इंधनाचे दर तब्बल 60 टक्क्यांनी वाढले, तर विमानप्रवास 34 टक्क्यांनी महाग झाला. गेल्या सहा महिन्यांच्या अवधीत अमेरिकी जनतेवर आपली बचत दैनंदिन खर्चासाठी वापरण्याची वेळ ओढावली असून त्यात तब्बल एक अब्ज डॉलर्सहून अधिक घट झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते.

जून महिन्यात वाढलेल्या महागाईमुळे अमेरिकी नागरिकांना मे महिन्याच्या तुलनेत जवळपास 500 डॉलर्स अधिक खर्च करावे लागल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन अमेरिका महागाईचा चांगल्या रितीने मुकाबला करीत असल्याचे दावे करीत आहेत. दरम्यान, अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था ‘बँक ऑफ अमेरिका’ने महागाई रोखण्यासाठी अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसणे जरुरीचे आहे, असे भाकित केले आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरांमध्ये मोठी वाढ करून मंदी आणण्याच्या तयारीत असल्याचा दावाही या वित्तसंस्थेने केला.

अमेरिकेतील अभूतपूर्व व वाढती महागाई आणि शेअरबाजारांमधील घसरण लक्षात घेता येत्या वर्षभरात अमेरिकेतला मोठ्या आर्थिक मंदीचा धोका आहे, असा इशारा अर्थतज्ज्ञ लॅरी समर्स यांनी गेल्याच महिन्यात दिला होता. समर्स यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात सल्लागार म्हणून काम केले होते.

leave a reply