जम्मू व काश्‍मीरला तालिबानच्या दहशतवादाचा धोका नाही

- माजी लष्करी अधिकाऱ्यांचा निष्कर्ष

श्रीनगर – अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर, भारताच्या सुरक्षाविषयक चिंता वाढल्या आहेत. तालिबानने काश्‍मीर प्रश्‍नाशी आपला संबंध नसल्याचे जाहीर केले आहे खरे. पण इतिहास लक्षात घेता, तालिबान जम्मू व काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानला सहाय्य पुरविल, असा दावा काही पत्रकार व विश्‍लेषकांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जम्मू व काश्‍मीरमध्ये जो कुणी शिरकाव करेल, तो जिवंतपणे परतणार नाही’, असे सांगून भारतीय लष्कराने तालिबानला संदेश दिला आहे. भारताचे माजी लष्करी अधिकारी देखील जम्मू व काश्‍मीरला तालिबानच्या दहशतवादाचा धोका संभवत नसल्याचा निष्कर्ष नोंदवित आहेत.

जम्मू व काश्‍मीरला तालिबानच्या दहशतवादाचा धोका नाही- माजी लष्करी अधिकाऱ्यांचा निष्कर्ष1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तानात तालिबानची राजवट होती. याच काळात जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद फोफावला. कारण यासाठी पाकिस्तानला तालिबानचे संपूर्ण सहाय्य मिळाले होते. या काळात दहशतवाद्यांच्या हिंसाचारात मोठी वाढ झाली होती. त्याचा दाखला देऊन अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानची सत्ता आल्याने काश्‍मीर असुरक्षित बनेल, अशी चिंता काही पत्रकार तसेच विश्‍लेषक व्यक्त करीत आहे. याची दखल घेऊन भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंग ढिल्लों यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर जम्मू व काश्‍मीरला धोका निर्माण झाल्याचे सांगून याबाबत बरेच काही बोलले व लिहिले जात आहे. पण जम्मू व काश्‍मीरमध्ये भारतीय लष्काराने अशा बऱ्याच घडामोडींचा सामना केलेला आहे. इथे घुसखोरी करणारा कुणीही जिवंत परत जाऊ शकणार नाही, अशा शब्दात भारतीय लष्कराच्या सज्जतेची लेफ्टनंट जनरल धिल्लों यांनी जाणीव करून दिली. यामुळे भारतीय लष्कर तालिबानपासून संभवणाऱ्या धोक्याला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान, वीस वर्षांपूर्वीची आणि आत्ताची परिस्थिती फारच वेगळी आहे, याकडे लक्ष वेधून आत्ताच्या परिस्थितीत तालिबान भारताला छेडण्याची चूक करणार नाही, असा निष्कर्ष भारतीय लष्कराचे माजी अधिकारी नोंदवित आहेत. आत्ताच्या भारताचे आर्थिक, राजकीय व लष्करी सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. तसेच जम्मू व काश्‍मीरची सीमा देखील अधिक सुरक्षित बनलेली आहे. त्यामुळे तालिबान दहशतवादी कारवाया करून भारताला आव्हान देणार नाही. त्याच्या दुष्परिणामांची जाणीव तालिबानला नक्कीच असेल, असे हे माजी लष्करी अधिकारी सांगत आहेत.

पाकिस्तानातील भारतद्वेष्टे गट तसेच पाकिस्तानी लष्कराचे माजी अधिकारी तालिबानला अफगाणिस्तान मिळालेल्या यशानंतर, दहशतवादाचा वापर करून भारताकडून काश्‍मीर मिळविण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. पण यावेळी तालिबानचा भारताच्या विरोधता वापर करण्याची स्वप्ने पाहू नका. उलट तालिबान भारताच्या प्रभावाखाली येऊन पाकिस्तानच्या विरोधात कारवाया सुरू करण्याचा धोका आहे, अशी भीती पाकिस्तानातीलच काही विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

leave a reply