चीन-पाकिस्तान सरावाच्या पार्श्‍वभूमीवर जपानचे हवाईदलप्रमुख भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली – जपानच्या हवाईदलाचे प्रमुख जनरल इझुत्सु शुंजी यांनी गुरुवारी भारताचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांची भेट घेतली. यावेळी दोन देशांमधील संरक्षण सहकार्य वाढविण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. बुधवारपासून चीन व पाकिस्तानदरम्यान हवाईसरावाला सुरुवात झाली असून, या पार्श्‍वभूमीवर जपानी हवाईदलप्रमुखांचा दौरा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्याच महिन्यात भारताने आयोजित केलेल्या ‘मलाबार’ नौदल सरावात जपान सहभागी झाला होता. त्यानंतर काही दिवसातच जपानच्या हवाईदलप्रमुखांनी भारताच्या दौऱ्यावर दाखल होऊन दोन देशांमधील वाढत्या सहकार्याचे संकेत दिले आहेत. जपानच्या हवाईदलाचे प्रमुख जनरल शुंजी यांनी गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत, नौदलप्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग व लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांचीही भेट घेतली आहे.

वायुसेनाप्रमुखांसह इतर सर्व भेटींमध्ये दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याशी निगडित मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तर वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व जनरल शुंजी यांच्या भेटीत दोन्ही देशांच्या हवाईदलांच्या ‘इंटरऑपरेबिलिटी’च्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. यात दोन्ही देशांच्या हवाईदलांमध्ये संयुक्त सराव आयोजित करण्याचा तसेच प्रशिक्षणाचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यात भारताने ‘क्वाड’मधील आपली सक्रियता वाढविली असून जपान व ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. जून महिन्यात भारत व जपानच्या नौदलामध्ये संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात भारत व जपानमध्ये अत्यंत महत्त्वाचा ‘लॉजिस्टिक सपोर्ट डील’वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार, दोन्ही देश परस्परांच्या संरक्षणतळांचा तसेच त्यावरील सुविधांचा वापर करू शकणार आहेत. ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी व आक्रमक कारवाया रोखण्यासाठी या हालचालींना वेग देण्यात आल्याचे मानले जाते.

दरम्यान, बुधवारपासून चीन व पाकिस्तानमध्ये संयुक्त हवाईसराव सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘शाहीन-9’ नावाचा हा सराव सिंध प्रांतातील हवाईतळावर सुरु असल्याचे सांगण्यात येते. चीनच्या हवाईदलाचे पथक पाकिस्तानमध्ये दाखल झाले असून दोन्ही देशांची संयुक्त क्षमता वाढविण्यासाठी सराव आयोजित केल्याचे सांगण्यात येते. हा सराव सुरू असतानाच जपानच्या हवाईदलप्रमुखांनी भारताला भेट देऊन संरक्षण सहकार्य अधिक वाढविण्याबाबत चर्चा करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply