चीन व उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जपानकडून संरक्षणसज्जतेसाठी 320 अब्ज डॉलर्सच्या तरतुदीची घोषणा

अमेरिकेकडून टॉमाहॉक क्षेपणास्त्रे खरेदी करणार

China and North Koreaटोकिओ – चीनकडून तैवानवरील हल्ल्याची वाढती शक्यता व उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या यामुळे पॅसिफिक क्षेत्रातील वाढता धोका लक्षात घेऊन जपानने आपल्या संरक्षणखर्चात मोठी वाढ करण्याची घोषणा केली. शुक्रवारी जपानने नवे राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केले. त्यात चीन हा जपानच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगून संरक्षणखर्चात अभूतपूर्व वाढ करणे गरजेचे असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. नव्या धोरणानुसार, जपान पुढील पाच वर्षात आपल्या संरक्षणसज्जतेसाठी तब्बल 320 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने आपल्या संरक्षणखर्चात केलेली ही सर्वात मोठी वाढ ठरते. जपानच्या नव्या धोरणाचे अमेरिकेने स्वागत केले असून चीनने जपान तणाव वाढवित असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

growing threatsजपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी शुक्रवारी जपानच्या नव्या ‘नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी’ची घोषणा केली. त्यात रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेखही करण्यात आला असून या युद्धाने दीर्घकालिन संघर्षासाठी शस्त्रसज्जता महत्त्वाची असल्याचे दाखवून दिल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्याचवेळी या संघर्षामुळे चीनसारख्या देशाची आक्रमकता वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. चीनने तैवानवर हल्ला केल्यास जपानी बेटांची सुरक्षाही धोक्यात येऊ शकते व जपानी अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल, असे नव्या धोरणात बजावण्यात आले. उत्तर कोरियाकडून सातत्याने होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांनी जपानच्या चिंतेत भर टाकल्याकडे ‘नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी’ने लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर, पुढील पाच वर्षात जपान आपला संरक्षणखर्च एकूण जीडीपीच्या दोन टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवत आहे, असे जपानच्या पंतप्रधानांनी सांगितले.

security boostनव्या ‘नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी’त प्रस्तावित संरक्षणखर्चातील मोठा भाग नवी क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, ड्रोन्स व युद्धनौकांसाठी वापरण्यात येईल असे संकेत देण्यात आले आहेत. जपान अमेरिकेकडून 500हून अधिक ‘टॉमाहॉक’ क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. त्याचवेळी इटली व ब्रिटनच्या सहाय्याने विकसित करण्यात येणाऱ्या प्रगत लढाऊ विमानासाठी साडेपाच अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. जपान एक हजार किलोमीटर्सहून अधिक पल्ला असणारी तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रेही विकसित करीत असून त्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जपानच्या संरक्षणदलात असलेल्या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना हायपरसोनिक इंटरसेप्टर बनविण्यासाठी जपानचे सरकार व संरक्षणदल विचार करीत आहे. 2029 सालापर्यंत जपान सदर क्षेपणास्त्राची निर्मिती पूर्ण करील, असा दावा केला जातो. त्याचबरोबर जपान आत्मघाती ड्रोन्सच्या निर्मितीसाठी देखील प्रयत्न करीत आहे.

leave a reply