जपानने सायबरसुरक्षा, एआय व क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात ‘ऑकस’शी सहकार्य करावे

- माजी पंतप्रधान शिन्झो ऍबे

शिन्झो ऍबेटोकिओ – अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या ‘ऑकस डील’चे स्वागत करून जपाननेही त्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो ऍबे यांनी केले आहे. सायबरसुरक्षा, आर्टिफिशल इंटेलिजन्स व क्कांटम तंत्रज्ञान या क्षेत्रात हे सहकार्य असावे, असा सल्ला ऍबे यांनी दिला. इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या स्थैर्यासाठी ‘ऑकस डील’ महत्त्वाचे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियाने मिळून व्यापक संरक्षण सहकार्य कराराची घोषणा केली होती. यात आण्विक पाणबुड्यांसह दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, सायबर तंत्रज्ञान, आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्कांटम तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन तसेच ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांनीही ‘ऑकस डील’ मर्यादित नसेल, विविध मुद्यांवरील सहकार्यासाठी त्यात इतर देश सहभागी होऊ शकतात, असे म्हटले होते.

शिन्झो ऍबेया पार्श्‍वभूमीवर, जपानच्या माजी पंतप्रधानांचे वक्तव्य लक्षवेधी ठरते. ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्र मुक्त व खुले ठेवायचे असेल तर समविचारी देशांशी सहकार्य वाढविणे महत्त्वाचे ठरते. ही बाब लक्षात घेता ऑकस डील स्वागतार्ह ठरते. इंडो-पॅसिफिकच्या स्थैर्यासाठी विविध क्षेत्रातील भागीदारीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जपाननेही ऑकस डीलमधून तयार झालेल्या चौकटीत सहकार्य करायला हवे. सायबरक्षमता, आर्टिफिशल इंटेलिजन्स व क्कांटम तंत्रज्ञान या क्षेत्रात जपान भागीदार ठरु शकतो’, याकडे माजी पंतप्रधान शिन्झो ऍबे यांनी लक्ष वेधले.

शिन्झो ऍबेयावेळी जपानच्या माजी पंतप्रधानांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षाविषयक परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचेही बजावले. या परिस्थितीचा मुकाबला करायचा असेल तर जपानला या क्षेत्रातील देशांबरोबर सुरक्षा व संरक्षणविषयक सहकार्य नव्या उंचीवर न्यावे लागेल, असे आवाहन ऍबे यांनी यावेळी केले. याबद्दल आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना त्यांनी ऑस्ट्रेलिया तसेच ‘क्वाड’ गटाबरोबरील भागीदारीचा उल्लेखही केला.

शिन्झो ऍबे यांनी आपल्या वक्तव्यात चीनचे नाव थेट घेतले नसले तरी संपूर्ण रोख चीनवरच होता, असा दावा सूत्रांनी केला आहे. ऍबे यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत चीनविरोधात आक्रमक धोरण राबविले होते. आता ऍबे पंतप्रधान म्हणून कार्यरत नसले तरी सत्ताधारी पक्ष व सरकारवर प्रभाव असणारे नेतृत्त्व म्हणून ओळखण्यात येतात. त्यामुळे त्यांनी ‘ऑकस डील’संदर्भात केलेल वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

leave a reply