चीनचा धोका वाढत असताना जपान – इंडोनेशिया संरक्षण सहकार्य करार

टोकिओ – ‘साऊथ चायना सी क्षेत्रात बळाचा वापर करून एकतर्फी फेरबदल करण्यासाठी सातत्याने सुरू असलेले प्रयत्न चिंताजनक ठरतात. जपान व इंडोनेशिया या दोन्ही देशांना याबाबत वाटत असलेली चिंता एकसमान आहे’, असे जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेदरम्यान, जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट नामोल्लेख टाळून चीनपासून असलेला धोका अधोरेखित केला. या टू प्लस टू चर्चेनंतर जपानचा इंडोनेशियाबरोबर संरक्षणसाहित्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याबाबतचा ऐतिहासिक करार संपन्न झाला.

हा करार ऐतिहासिक ठरतो, असे सांगून इंडोनेशियाचे संरक्षणमंत्री प्राबोवो सुबियांतो यांनी याचे स्वागत केले. इंडोनेशियाच्या संरक्षण सामर्थ्याचे अद्ययावतीकरण आणि इंडोनेशियन लष्कर व नौदलाला प्रशिक्षित करण्यासाठी जपानने यापुढे अधिक सहाय्य करावे, असे आवाहन संरक्षणमंत्री सुबियांतो यांनी केले. तर ‘जपान आणि इंडोनेशिया एकत्र येऊन स्वतंत्र आणि मुक्त सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतील’, असा विश्‍वास संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी व्यक्त केला. याद्वारे इंडोनेशियाला आवश्यक असलेले संरक्षणविषयक सहकार्य पुरविण्यासाठी जपान उत्सुक असल्याचा संदेश संरक्षणमंत्री किशी यांनी दिला आहे.

दोन्ही देशांमध्ये पार पडलेल्या या चर्चेत साऊथ चायना सी क्षेत्रात चीनच्या कारवायांमुळे परिस्थिती चिघळत चालली आहे, यावर एकमत झाले. मात्र यासाठी दोन्ही देशांनी चीनवर थेट आरोप केले नाहीत. पण साऊथ चायना सी क्षेत्रातील शांतता व समृद्धी गृहित धरता येणार नाही, इतकी अस्थीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, असे सांगून बळाचा वापर करून एकतर्फी कारवाया करणार्‍या शक्तींमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा ठपका जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी ठेवला.

दरम्यान, साऊथ चायना सी क्षेत्रातील चीनच्या हालचाली चिंताजनक पातळीच्याही पुढे गेल्या आहेत. फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत चीनच्या २२० जहाजांनी घुसखोरी केली असून ही जहाजे फिलिपाईन्सने इशारा दिल्यानंतरही हे क्षेत्र सोडायला तयार नाहीत. यानंतर फिलिपाईन्सच्या हवाई दलाने या चिनी जहाजांवर गस्त सुरू केली आहे. त्यामुळे इथला तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. चीन संपूर्ण साऊथ चायना सी क्षेत्र आपल्याच मालकीचे असल्याचा दावा करीत असून यामुळे व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, तैवान, ब्रुनेई आणि इंडोनेशियाचेही हितसंबंध धोक्यात आले आहेत.

अशा परिस्थितीत इंडोनेशियाने आपली तटस्थता सोडून संरक्षणविषयक क्षमता वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. इंडोनेशिया व जपानमध्ये पार पडलेली ‘टू प्लस टू’ चर्चा हा या प्रयत्नांचा भाग ठरतो. विशेषतः जपानकडून संरक्षणविषयक सहकार्य मिळवून इंडोनेशिया बलाढ्य चीनच्या दडपणाचा सामना करण्याच्या तयारीत आहे. साऊथ चायना सी क्षेत्राप्रमाणेच ईस्ट चायना सी क्षेत्रातील आपल्या बेटसमुहांवर अधिकार सांगणार्‍या चीनच्या विरोधात जपान आक्रमक बनला आहे. आसियानच्या सदस्यदेशांबरोबर आर्थिक, राजकीय व लष्करी सहकार्य वाढवून जपान चीनला प्रत्युत्तर देत आहे. यामुळे अस्वस्थ झालेला चीन अधिकाधिक आक्रमक बनत असताना, जपानने देखील आपल्या व्यूहरचनेवर वेगाने काम सुरू केले आहे. पुढच्या काळात या क्षेत्रातील देशांबरोबर चीनच्या विरोधातील सहकार्य वाढविण्यासाठी जपान अधिक पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट संकेत यामुळे मिळत आहेत.

leave a reply