‘वन चायना पॉलिसी’ नाकारण्याची जपानची तयारी

- ‘व्हाईट पेपर’मधील चीनच्या नकाशात तैवानचा समावेश नाही

टोकिओ/तैपेई/बीजिंग – तैवानच्या क्षेत्रातील स्थैर्य जपानसाठी आवश्यक असल्याचा दावा करणार्‍या जपानने चीनला अजून एक धक्का दिला आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘व्हाईट पेपर’ अर्थात श्‍वेतपत्रिकेत ‘वन चायना पॉलिसी’पासून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. श्‍वेतपत्रिकेत चीनसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांमध्ये चीनच्या नकाशाबरोबरच तैवान दाखविण्यात आलेला नाही. याचा अर्थ जपान तैवानला स्वतंत्र देश मानत आहे, असा असल्याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले आहे.

‘वन चायना पॉलिसी’ नाकारण्याची जपानची तयारी - ‘व्हाईट पेपर’मधील चीनच्या नकाशात तैवानचा समावेश नाहीमंगळवारी जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी जपानसमोर असलेली सुरक्षाविषयक आव्हाने व संरक्षणसज्जता यांचा उल्लेख असलेली श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. यात तैवानच्या सुरक्षेचा व स्थैर्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला होता. ‘तैवानच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या चीनच्या हालचाली धोकादायक असून, या क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणे जपानची सुरक्षा व आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी आवश्यक आहे’, या शब्दात जपानच्या संरक्षण मंत्रालयाने तैवानच्या सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले होते.

तैवानचा मुद्दा केंद्रस्थानी आणणार्‍या जपानने चीनला अजून एक धक्का दिल्याचे समोर आले आहे. श्‍वेतपत्रिकेत चीनसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या काही लेखांमध्ये चीनचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नकाशात फक्त चीनच दाखविण्यात आला असून तैवान दाखविण्यात आलेला नाही. ‘वन चायना पॉलिसी’नुसार चीन व तैवान एकच आहे, हे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे धोरण आहे. त्यामुळे चीनचा नकाशा दाखविताना त्यात तैवान हा चीनचाच भाग असल्याचे दाखविणे बंधनकारक मानले जाते.
मात्र जपानच्या संरक्षण मंत्रालयाने चीन व तैवान स्वतंत्र दाखविले आहेत. तैवानला वेगळे दाखवून व स्वतंत्र उल्लेख करून जपान ‘वन चायना पॉलिसी’ला महत्त्व देत नसल्याचे संकेत देण्यात आल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत. तैवान सरकारनेही जपानकडून करण्यात आलेल्या बदलाची दखल घेतली असून, जपानचे आभार मानले आहेत.

गेल्या काही वर्षात जपान व चीनमधील संबंधांमध्ये सातत्याने चढउतार सुरू असून सध्या तणाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. चीनकडून ईस्ट चायना सीमध्ये वारंवार सुरू असणारी घुसखोरी, कोरोनाच्या साथीबाबत केलेली लपवाछपवी, हाँगकाँगवर लादण्यात आलेला कायदा आणि आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या बळावर दडपण टाकण्याचे प्रयत्न या मुद्यांवर जपानने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन देशांमध्ये यावरून सातत्याने शाब्दिक चकमकी व संघर्ष उडत असल्याचेही समोर येत आहे. या तणावात तैवानच्या मुद्याचीही भर पडली असून जपानने अधिकाधिक ठाम भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे ‘व्हाईट पेपर’मध्ये घेतलेली भूमिका व नकाशावरून स्पष्ट होत आहे.

गेल्याच महिन्यात, जपानने तैवानला कोरोनाच्या लक्षावधी लसी भेट दिल्या होत्या. त्यानंतर जपानच्या पंतप्रधानांनी संसदेतील एका सत्रात, तैवानचा ‘देश’ म्हणून उल्लेख केला होता. त्यापाठोपाठ जपानच्या संसदेने तैवानला ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’त सहभागी करण्यासंदर्भातील ठराव बहुमताने मंजूर केल्याचे समोर आले होते. तैवानच्या समर्थनार्थ जपानकडून एकामागोमाग उचलण्यात येणारी पावले चीनला चांगलीच अस्वस्थ करणारी ठरत आहेत.

leave a reply