चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात जपान-अमेरिका-फ्रान्सचा युद्धसराव

टोकिओ – ‘मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिकबाबतच्या जपानच्या भूमिकेशी फ्रान्स देखील सहमत आहे. म्हणून जपान आणि अमेरिकेच्या लष्करात होणार्‍या युद्धसरावात पहिल्यांदाच फ्रान्स देखील सहभागी होणार आहे’, अशी घोषणा जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी केली. जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले नसले तरी, सदर युद्धसराव या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून फ्रान्सने देखील इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपला सहभाग वाढविला असून फ्रान्सच्या युद्धनौका आणि पाणबुडीने काही दिवसांपूर्वीच या क्षेत्रात गस्त घातली होती.

जपानचे ग्राऊंड सेल्फ-डिफेन्स फोर्स (जेजीएसडीएफ) अर्थात लष्कर, अमेरिकेचे मरिन्स आणि फ्रान्सचे लष्कर पुढच्या महिन्यात संयुक्त सराव करणार आहेत. जपानच्या नैऋत्येकडील आयनोरा येथील लष्करी तळावर आणि किरिशिमा प्रशिक्षण तळावर हा युद्धसराव पार पडेल. ११ ते १७ मेच्या दरम्यान हा युद्धसराव होईल, अशी माहिती जपानचे संरक्षणमंत्री नोबुआ किशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आत्तापर्यंत जपानने अमेरिका तसेच भारत, ऑस्ट्रेलिया या क्वाड सदस्य देशांबरोबर युद्धसरावात सहभाग घेतला होता. तसेच दक्षिण कोरिया आणि असियानबरोबरही स्वतंत्र सराव केला आहे. पण पहिल्यांदाच जपानचे लष्कर इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या पलिकडील देशाबरोबर सरावात सहभागी होणार असल्याचे संरक्षणमंत्री किशी म्हणाले. जपानच्या लष्करासाठी हा मोठा अनुभव असेल, असा दावा किशी यांनी केला.

फ्रान्स इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील नसला तरी या क्षेत्रात फ्रान्सचे हितसंबंध असल्याची आठवण जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी करून दिली. हिंदी महासागर क्षेत्रात ‘रियुनियन’ तर दक्षिण पॅसिफिक क्षेत्रात ‘फ्रेंच पॉलिनेशिया’ ही फ्रान्सची दोन बेटे आहेत. या बेटांची सुरक्षा व सार्वभौमत्वासाठी फ्रान्सच्या युद्धनौका या सागरी क्षेत्रातून प्रवास करीत असतात. म्हणून मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिकबाबतच्या जपानच्या भूमिकेशी फ्रान्स देखील सहमत असल्याचे संरक्षणमंत्री किशी म्हणाले. तसेच जपानच्या सागरी हद्दीतील बेटांच्या संरक्षणासाठी आवश्यक कौशल्य या सरावातून आपल्या लष्कराला मिळेल, असा दावा संरक्षणमंत्री किशी यांनी केला.

गेल्या आठवड्यात जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. या दौर्‍यात जपान आणि अमेरिकेने चीनच्या धोक्याविरोधात एकजुटीने उभे राहण्याची घोषणा केली होती. तसेच चीन आपल्या लष्करी आक्रमकतेच्या जोरावर ईस्ट व साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप पंतप्रधान सुगा यांनी केला होता. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात जपानने अमेरिका तसेच फ्रान्ससह संयुक्त युद्धसरावाची घोषणा करून चीनला आव्हान दिल्याचे दिसत आहे.

leave a reply