‘ईस्ट चायना सी’मधील चीनच्या इंधन उत्खननावर जपानची टीका

टोकिओ – चीनकडून ‘ईस्ट चायना सी’मध्ये सुरू असलेल्या इंधन उत्खननावर जपानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या एकतर्फी हालचाली निंदनीय असून जपान ही गोष्ट कधीच स्वीकारणार नाही, असा इशारा जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी दिला. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्यावर चीनकडे राजनैतिक पातळीवर तक्रार दाखल केल्याचेही समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या जपान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जपान व चीनदरम्यान उभा राहिलेला हा वाद लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

Japan's criticismगेल्या काही वर्षात चीनने ‘साऊथ चायना सी’ बरोबरच ‘ईस्ट चायना सी’ मधील आपल्या कारवाया वाढविल्या आहेत. चीनची विमाने, पाणबुड्या, गस्ती नौका तसेच युद्धनौका जपानच्या सागरी हद्दीत सातत्याने घुसखोरी करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनची ‘लिओनिंग’ विमानवाहू युद्धनौका आणि आठ विनाशिकांनी जपानच्या ओकिनावा बेटाजवळून प्रवास केला होता. त्यापूर्वी चीन व रशियाच्या संयुक्त सरावादरम्यान चीनच्या युद्धनौकांनी जपानच्या सागरी क्षेत्रानजिक गस्त घातली होती. चीनच्या या हालचाली जपानला इशारा देण्याचा भाग असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

China's fuel explorationकाही दिवसांपूर्वी चीनच्या पथकाने ‘ईस्ट चायना सी’मधील वादग्रस्त मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात इंधन उत्खननासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या भागावर जपान व चीन या दोन्ही देशांनी दावा सांगितला आहे. 2008 साली यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी करारही झाला होता. मात्र त्याच्या अंमलबजावणीवरून वाद झाल्याने तणाव चिघळला होता. त्यानंतरही चीनने ‘ईस्ट चायना सी’ जवळपास 17 ठिकाणी इंधन उत्खननासाठी यंत्रणा उभारल्या होत्या. जपानकडून सातत्याने होणाऱ्या विरोधानंतरही चीनने आपल्या हालचाली थांबविलेल्या नाहीत.

त्यामुळे जपानने आता अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जपान दौऱ्यावर येत असतानाच जपानी पंतप्रधानांनी चीनवर टीकास्त्र सोडून तीव्र नाराजी व्यक्त करणे त्याचाच भाग ठरतो. बायडेन यांच्या जपान दौऱ्यात चीनच्या कारवाया हा मुख्य मुद्दा राहणार आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊनच जपानच्या पंतप्रधानांनी आग्रही भूमिका घेऊन चीनच्या कारवायांकडे लक्ष वेधल्याचे मानले जाते.

leave a reply